*विकासाचा वाटसरू – शिवतेजसिंह मोहिते-पाटील*
अकलूज म्हणजे सोलापूर जिल्ह्याची राजकीय राजधानी तर महाराष्ट्रासाठी विकासाचे एक मॉडेल म्हणून पाहिले जाते. आशिया खंडात अग्रेसर असलेल्या या गावचे नेतृत्व करणे म्हणजे तशी खूप मोठी जबाबदारी परंतु गेल्या दोन वर्षापासून शिवबाबांनी ही जबाबदारी अगदी लिलया पेलली आहे. आपल्या झंझावती कामकाजातून नागरीकांच्या चेहर्यावर समाधान दिसेल या प्रयत्नातून त्यांनी कामाचा धडाका तर लावलाच आहे परंतु डिजीटल प्रणाली द्वारे अत्याधुनिक सोयी सुविधा देण्याचाही त्यांचा प्रयत्न चालू आहे. या ग्रामपंचायतीची शतक महोत्सवाकडे यशस्वी वाटचाल होत असताना स्थापनेपासून सक्षम नेतृत्त्वाने लोकाभिमुख कारभार केल्यामुळे अकलूज ग्रामपंचायतीचा कायापालट होऊन गावाचा विकास साधला आहे. ग्रामपंचायतीच्या एकमुखी कारभारामुळेच प्रत्येक सरपंचांनी त्यांच्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी करीत गावच्या नावलौकिकात भर टाकण्याचे काम केले. या ग्रामपंचायतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील पोहण्याचा तलाव, क्रीडा संकुल, शॉपिंग सेंटर, घरकुले राबविणारी एकमेव ग्रामपंचायत म्हणून प्रसिध्दी मिळविली आहे. याच ग्रामपंचायतीने राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर नेतृत्त्व दिले असून स.म.कै.शंकरराव मोहिते-पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, प्रतापसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे राज्याला तर चांगोजीराव देशमुख, मदनसिंह मोहिते-पाटील, फत्तेसिंह माने-पाटील, धैर्यशिल मोहिते-पाटील यांचे जिल्ह्याला नेतृत्त्व मिळाले, जयसिंह मोहिते-पाटील, किशोरसिंह माने-पाटील, संग्रामसिंह मोहिते-पाटील हे आज तालुकास्तरावर नेतृत्त्व करीत आहेत तसेच आज शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या रूपाने सर्वात युवा सरपंच अकलूज ग्रामपंचायतीला मिळाला आहे. अकलूज ग्रामपंचायतीची स्थापना 1922 साली झाली. 1922 ते सन 1956-57 या कालखंडात अकलूज हे एक छोटसं गाव होतं. दुष्काळी परिस्थिती, वीज, पाण्याची सोय नव्हती. रोजगाराच्या संधी उपलब्ध नव्हत्या. अशा खडतर परिस्थितीमध्ये परिस्थितीला तोंड देत अत्यंत धैर्याने, साखर कारखान्याच्या माध्यमातुन अनेक सहकारी संस्था निर्माण झाल्या. अकलूजमध्ये शिवामृत दूध संघ, सूतगिरणी, पोल्ट्री फार्म, सहकारी कारखाने इच्यादी महत्त्वाच्या संस्था असून त्या संस्थांच्या मुळे व्यापार वाढणेस मदत झालेली आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जवळपास विविध मालाचे 1600 दुकान गाळे असून सुमारे 100 इतर व्यापारी यांचे व्यावसाय चालतात. अकलूज ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेप्रमाणे 39919 इतकी असून निरनिराळ्या सहकारी संस्था, शिक्षण संस्था यामधून नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. श्री.अकलाई देवी ग्रामीण तीर्थक्षेत्र घोषित झाले. मंदिर सुशोभीकरण झाले. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सहकार्यातून, योगदानातून महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडून मोठा निधी उपलब्ध झाला. अकलूज ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या पुरातन भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरण झालेले असून त्या ठिकाणी शिवसृष्टी उभारली. हा ऐतिहासिक भुईकोट किल्ला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा करण्यासाठी तो लंडन येथील लिडस या किल्ल्याची बरोबरी करू शकेल असे अत्यंत सुंदर असे काम या ठिकाणी झाले आहे. किल्ल्याचे सुशोभीकरण करत असताना त्यामध्ये लाईट अँड साऊंड शो च्या माध्यमातून मुलांना व परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार असून हजारो पर्यटक परप्रांतातून व परदेशातून येथे येतील .पर्यटकांना उत्कृष्ठ सेवा देण्यासाठी हॉटेल्स, गाईडस्, छोट्या उद्योगातून पर्यटकांच्या खरेदीसाठी स्टॉल्स तसेच प्रवासी वाहतूक यासाठी येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याकरिता येथील तरूणांना शासनाच्या माध्यमातून प्रशिक्षण देणेची सोय केली आहे. शेती, सहकार एवढ्यावरच न थांबता पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास साधला जात आहे. हाच वसा आणि वारसा पुढे यशस्वीरित्या चालविण्यासांठी शिवतेजसिंह अहोरात्र झटताना दिसत आहेत. जे काही जगात आहे ते अकलूज मध्ये आणण्याच्या विजयदादांच्या स्वप्नाला साजेशी कामगिरी करण्याचा शिवबाबांचा सतत प्रयत्न असतो. सरपंच पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रथम सिग्नल व्यवस्था चालू करण्याचा निर्णय घेतला. खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री असताना राज्यात सर्वप्रथम एखाद्या ग्रामपंचायत स्तरावरील गावात सिग्नल व्यवस्था चालू केली होती. परंतु अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे ती 8 ते 9 वर्षे बंद होती. विजयदादांनी ज्या तळमळीने सिग्नल चालू केले होते त्या भावनेचा आदर करून शिवबाबांनी सिग्नल व्यवस्थेसाठी निधीची तरतूद करून सदुभाऊ चौक व गांधी चौक येथे अत्याधुनिक एल.ई.डी सिग्नल सेवा नव्याने चालू केली. अकलूजच्या प्रमुख मार्गाबरोबरच गावातील रस्त्यांवरील जुन्या अंधुक दिव्यांच्या जागी नवीन एल.ई.डी पथ दिवे बसविले. या दिव्यांचे वैशिष्ठ्ये म्हणजे या दिव्यांना बंद चालू करण्यासाठी माणसाची गरज नाही अंधार पडला की हे दिवे आपोआप चालू होतात व सकाळी उजेड पडला की आपोआप बंद होतात. यामुळे विजेची बचत तर झालीच परंतु विज कंपनी कडून येणार्या भरमसाठ विज बिलाला ही कात्री लागली. अकलूज ग्रामपंचायतीच्या दृष्टीने ऐतिहासीक व देशातील इतर ग्रामपंचायतीच्या दृष्टीने आदर्श असा सर्वात मोठा निर्णय शिवबाबांनी घेतला तो म्हणजे जी.आय.एस. प्रणाली द्वारे घरपट्टी आकारणीचा. राज्यातील काही निवडक महानगरपालिका सोडल्यातर अनेक महानगरपालिकेने सुध्दा ही प्रणाली अवलंबली नाही. अशा अत्याधुनिक जी.आय.एस. प्रणालीचा अकलूजमध्ये वापर सुरू करून देशासाठी एक आदर्श ठेवला आहे. या प्रणालीद्वारे गावातील एक ना एक घराची विस्तृत माहिती सॅटेलाईट द्वारे संगणकात जमा होऊन त्यानुसार घरपट्टी आकारली जाणार आहे. यामुळे कोणी घरपट्टी चुकविण्याचा विषय तर येणारच नाही उलट जे घरपट्टी भरत नव्हते, ज्यांच्या छुप्या मालमत्ता आहेत. अशांना आता लपून राहता येणार नाही. ही प्रणाली बसविल्यामुळे सुमारे जवळपास एक हजार च्या आसपास यापुर्वी कधीही घरपट्टी न भरलेल्या मालमत्ता समोर आल्या असुन या द्वारे दिड कोटी पेक्षा अधिक रूपयांनी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडणार आहे. शिवाय घंटागाड्यांच्या तक्रारी, कर्मचार्यांचा हलगर्जीपणा यांचा विचार करून घंटा गाड्यांना जी.पी.एस.प्रणाली लावून त्या विषयावर रामबाण उपाय शोधला. आता कोणती गाडी कोणत्या रूटवर आहे किती किलोमिटर फिरली किती डिझेल गेले या सर्वांचा अगदी तंतोतंत ताळमेळ संगणकादद्वारे घातला जात आहे. वारंवार पडणारा दुष्काळ, पाण्याची कमतरता लक्षा घेता शिवबाबांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ हा विषय हाती घेतला. प्रथम प्रमुख कार्यकर्ते, सदस्य यांना हा विषय समजून सांगून हि एक चळवळ बनविण्याचे आवाहन केले. यासाठी स्वत: प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक गल्लीत जाऊन सभा घेऊन, मिटींगा घेऊन रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्व सांगितले. आपल्या भागात पडणार्या पावसाच्या सरासरीचा विचार केल्यास आपण पावसाळ्याच्या दिवसात मुबलक पाणी साठवु शकणार आहे किंवा ते जमीनीत पाझरवता येऊ शकणार आहे आणि याचा फायदा आपणाला पुढील काळात नक्कीच होणार हे पटवून देण्यासाठी त्यांनी लोकांसमोर आकडेवारी मांडली यामधये आपल्या भागात सरासरी 553 मी.मी. पाऊस पडतो या प्रमाणे 1000 स्क्वे. फुटच्या घरावर 553 मी.मी. पाऊस पडला तर 42 हजार लिटर पाणी साठते याच हिशोबाने अकलूज परिसरातील 8000 घरांच्या छतावरून पडणारे समुारे 72 कोटी लिटर पाणी आपण साठवु शकणार असल्याचे त्यांनी पटवून दिले. तांत्रीक बाबी समजवावण्यासाठी त्यांनी काही तज्ञ लोक बोलवून त्यांच्याद्वारे ही मार्गदर्शन करण्याचा शिवबाबांनी प्रयत्न केला. विशेष म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प बसविणार्यांना ग्रामपंचायती मार्फत 2500 रूपयांचे विशेष सहायता अनुदान देण्याचाही निर्णय त्यांनी घेतला. अकलूजमधील बहुतांश भागातील प्रमुख चौकाच्या ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यासाठी माजी खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कडून आग्रहाने खासदार निधीतून निधी उपलब्ध करून घेतला. अकलूजचे सौंदर्य आबाधित ठेवण्यासाठी डिजीटल बॅनर लावण्यास बंदी आणण्याचाही महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्याचे रूपांतर जाहिरातींच्या फ्लेक्स द्वारे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात केला. अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या बुध्दविहाराच्या जागेबाबत खा.विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.पक्षनेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या सल्ल्याने ग्रामपंचायतीच्या इतिहासातील आणखी एक महत्वपूर्ण निर्णय शिवबाबांनी घेतला. ज्या प्रमाणे बुध्दविहाराच्या जागेचा प्रश्न प्रलंबीत होता त्याच प्रमाणे लिंगायत समाज, वडार, कैकाडी, घिसाडी आदी भटक्या विमुक्तांच्या स्मशनभूमीचा प्रश्नही या निमित्ताने पुढे आला होता. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी शिवबाबांनी धैर्यशिल भैय्यांच्या साथीने सर्व धर्मिय प्रमुख पदाधिकार्यांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित केली. उपलब्ध जागा व त्यानुसार त्याचे प्रत्येक समाजाच्या मागणीनुसार योग्य विभाजन करण्यावर चर्चा करून हा विषय मार्गी लावण्यात त्यांना यश मिळाले. यामध्ये नवबौध्द समाजाच्या बुध्दविहारासाठी 40 आर. जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला तर लिंगायत समाज व महानुभव समाजासाठी 85 आर, वडार व कैकाडी समाजासाठी 15 आर, गोंधळी रजपूत, रामलीला, घिसाडी व बेवारस प्रेतांचे दफन करण्यासाठी 5 आर जागा देण्याचा ऐतिहासीक निर्णय शिवबाबांनी जाहिर केला. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयावर सर्व समाजातील बांधवांनी समाधान व्यक्त करून धैर्यशिल मोहिते-पाटील व शिवबाबांचे जाहिर आभार मानले. जिल्ह्यात प्रथमच बुध्दविहाराच्या बाबतीत एखाद्या ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यास प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी बाबांनी प्रचंड परीश्रम घेतले व ते अजुनही चालूच आहेत. तहसिल कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी वारंवार चर्चा करून बैठका घेऊन कागदोपत्री पाठपुरावा चालूच ठेवला आहे. लवकरच याबाबत प्रशासकीय मान्यता मिळवून माजी खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथे राज्याला आदर्श असे बुध्द विहार उभारण्याचा आपला संकल्प असल्याचेही शिवबाबांनी जाहिररित्या सांगितले आहे व त्या दृष्टीने त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. अकलूज परिसरातील महर्षि शंकरराव मोहिते-पाटील कॉलनी च्या प्रवेश द्वारास साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याच्या मागणीलाही जराही विलंब न लावता शिवबाबांनी सहमती दर्शवली व आठ दिवसात ते काम पूर्ण केले. तसेच जुन्या बसस्थानकासमोरील अण्णाभाऊ साठे स्मारकात पंचधातुचा अण्णाभाऊंचा नविन पुतळा बसविण्याचेही त्यांनी मान्य करून लवकरच त्याचीही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुस्लीम समाजाची प्रमुख मागणी असलेल्या अकलूजच्या कब्रस्तान येथे निवारा शेड च्या मागणीला शिवतेजसिंह यांनी तात्काळ मंजुरी देऊन अवघ्या महिनाभरात ते पूर्ण करून दिले मुस्लीम कब्रस्तान येथे बांधण्यात आलेले निवारा शेड सोलापूर शहर वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकमेव आहे. सर्व समाजाला समान न्याय देऊन त्यांना एकत्रीत करण्याचे त्यांचे कौशल्य खरोखरच वाखाणन्या जोगे आहे. कसलाही भेदभाव न करताना त्यांनी आतापर्यंत सर्व समाज व सर्व स्तरावरील नागरीकांचे प्रश्न अगदी काळजीपूर्वक सोडविले आहेत त्यांच्याकडे येणारा माणूस सहसा निराश होऊन जात नाही. सर्व महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त ग्रामपंचायतीमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात येते. अकलूजच्या पाणीपुरवठ्याच्या बाबतीत शिवबाबा कमालीचे दक्ष असल्याचे नेहमीच पहायला मिळते. तळ्यात उपलब्ध असणार्या पाण्याची रोजच्या रोज माहिती घेऊन त्यानुसार पाण्याचे नियोजन केले जाते तसेच पाण्याची कमतरता भासल्यास लगेच खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधून पाणी सोडण्याबाबत त्यांचा पाठपुरावा चालू असतो. जि.प.पक्षनेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल दुरूस्ती मधून लोखंडी पाईप टाकणे, अकलूज मधील वॉर्ड नं. 3,4,5 मध्ये रस्त्याच्या वरून लोखंडी पाईप लाईन टाकणे हे पूर्ण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी व कामाच्या गुणवत्तेसाठी शिवबाबांचे बारकाईने लक्ष दिले. शिवाय अकलाईनगर येथे पाईप लाईन टाकणे, बोअरवेल मध्ये मोटर बसवणे, विकासनगर येथे नवीन पाईपलाईन करणे, नवीन पाणी टँकर बनविणे आदी महत्वाच्या कामांसाठीही त्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच पाणीपुरवठा योजनेच्या तलावाची साठवण क्षमता वाढविण्याबरोबरच त्याचे आर.सी.सी. बांधकाम करणे, तसेच या तलावापर्यंत कालव्यापासून पाईपलाईन टाकणे आदी महत्वाच्या विषयासाठी खा.विजयसिंह मोहिते-पाटील, धैर्यशिल मोहिते-पाटील, पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकार्यांना सोबत घेऊन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना मंत्रालयात जावून समक्ष निवेदन दिले. त्यावेळी मंत्रीमहोदयांनी त्यांच्या कमी वयातील कामकाजाची दखल घेऊन अभिनंदन केले व संबंधित कामे लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. राज्यभर पाण्यासाठी वणवण असताना केवळ योग्य नियोजन करून त्यांनी अकलूज परिसरातील नागरीकांना पाण्याची कमतरता भासू दिली नाही. याबाबत अनेक नागरीकांचे त्यांचे कौतुक करून अभिनंदनही केले आहे.जिल्हा परिषद शाळा अद्ययावतकरून तेथील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे तर शिवबाबांचे प्रमुख स्वप्न आहे. यासाठी त्यांचे ग्रामपंचायत स्तरावर तर प्रयत्न चालूच आहेत परंतु वैय्यक्तीक पातळीवर नवनवीन संकल्पना ते राबवित आहेत. राऊतनगर येथील जिल्हा परिषद शाळेत स्वखर्चाने प्रोजेक्टर भेट देऊन विद्यार्थ्यांना डिजीटल क्लासचा अनुभव दिला तर इतर जिल्हा परिषद शाळेतील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना सर्व शालेय साहित्य, बुट, गणवेश, दफ्तर, वही देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आहे. अकलूज परिसरातील जिल्हा परिषदेच्या शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्याबरोबर नियमित चर्चा विनीमय करून त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शिवबाबांचा काळजीपूर्वक प्रयत्न चालू असल्याचे पहावयास मिळते. आरोग्याच्या बाबतीत तर शिवबाबांचे अतिशय बारकाईने लक्ष असते. स्वच्छता विषयक नियमित जनजागृती करून नागरीकांना आरोग्याचे महत्व ते पटवून देतात. आपल्या भागात घंटा गाडी नियमित येते का? याबाबतही नागरीकांशी विचारपूस चालू असते. सरपंच पदावर विराजमान झाल्यापासून त्यांनी 10 घंटागाड्या व 37 कचराकुंड्या खरेदी केल्या आहेत. तर शौचालयाच्या बाबतीतही त्यांनी जनजागृती करून मोठठ्या प्रमाणात शौचालये बांधण्याचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. केवळ शिवबाबांच्याच नव्हेतर राज्यातील कोणत्याही सरपंचाच्या बाबतीतील सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी आयोजित केलेला शिधापत्रीकेचा कॅम्प. केवळ एका ग्रामपंचायत कार्यालयातील 2002 नागरीकांना एकावेळेस शिधापत्रीका मिळवुन देण्याचे ऐतिहासीक काम शिवतेजसिंह यांनी केले आहे. गावात फिरत असताना जिथे जाईल तिथे गोरगरीब नागरीकांकडून शिधापत्रीका नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत होत्या. हे काम ग्रामपंचायतीचे नाही हे सांगितले तरी लोकांना समजत नाही हे लक्षात आल्यानंतर शिवबाबांनी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधला तहसिलदार बाई माने यांना आमंत्रीत करून लोकांच्या अडचणी त्यांच्या समोर विषद केल्या. शिवबाबांची लोकांप्रतीची तळमळ व उपस्थित नागरीकांच्या भावनांचा आदर करत तहसिलदारांनी ही सर्कल, तलाठी यांना आदेश देऊन वॉर्ड निहाय नागरीकांची यादी बनविण्याचे आदेश दिले व कागदपत्रांची पुर्तता केल्यास तात्काळ रेशनकार्ड उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार नागरीकांनीही कागदपत्रांची पुर्तता केली व एका वेळेस सुमारे 2002 नागरीकांना घरपोच रेशन कार्ड देण्याची कामगिरी शिवबाबांनी केली. आपल्या नावचे रेशनकार्ड पाहिल्यानंतर नागरीकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता… समाधानाचे हास्य त्यांच्या चेहर्यावर चमकत होते… शिवबाबा तुमचे खूप खूप आभार हे सांगायला त्यांच्या शब्दांपेक्षा डोळेच मोठ्या उत्साहात बोलताना पहावयास मिळत होते…

– सागर संजय खरात, अकलूज








