*शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये जिजाऊ जयंती आणि युवा दिन साजरा*




संग्रामनगर दि.१२ (केदार लोहकरे यांजकडून) स्वराज्याची सावली,महाराष्ट्राची माऊली असे आपण ज्यांना म्हणतो अशा जिजाऊ मासाहेब आणि तेजस्वी व्यक्तिमत्व,महान तत्वज्ञ,कुशल वक्ता,अचाट बुद्धीसामर्थ्यवादी,श्रुतीधारा असे ज्यांचे वर्णन केले जाते ते अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद.शिवरायांच्या मनात स्वराज्याची ठिणगी पाडणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ,स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणाऱ्या आऊसाहेब म्हणजे जिजाऊ त्याचप्रमाणे पाश्चात्य जगाला वेद आणि योगाच्या भारतीय दर्शनाचा परिचय करून देण्यात आणि हिंदू धर्माला जागतिक धर्माचा दर्जा मिळवून देण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका होती असे स्वामी विवेकानंद. यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वी जीवनाची वाटचाल करावी हा संदेश देणारा आजचा दिवस.या दिवसाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेतील शिक्षिका सौ.शिल्पा जाधव होत्या. या कार्यक्रमाची सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे फोटो पूजन करण्यात आले.त्यानंतर प्रशालेतील काही विद्यार्थिनी जिजाऊ आणि काही विद्यार्थी स्वामी विवेकानंदांच्या वेशभूषेमध्ये आले होते.या निमित्ताने काही मुलींनी जिजाऊंची भूमिका सादर केली आणि काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली. विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र माने देशमुख सरांनी जयंतीदिनी आपले मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमाचा शेवट अध्यक्षीय भाषणाने झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु.प्राची काळे आणि कु.माही बागल यांनी केले.







