*जि.प. प्रा. मुलींची आदर्श शाळा नं.१ अकलूज येथे, बालविवाह निर्मूलन अंतर्गत पालक प्रबोधन मेळावा संपन्न*
अकलूज- बालविवाह थांबविण्यासाठी आपल्या भारत देशात बालविवाह प्रतिबंध कायदा लागू आहे. तरीही समाजात लपून-छपून बालविवाह होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पण कुठलीही अनिष्ट सामाजिक प्रथा फक्त कायदे करून थांबवता येत नाही. त्यासाठी पालकांचे, समाजाचे प्रबोधन होणे आवश्यक असते. याच उद्देशाने जि. प. प्रा. मुलींची आदर्श शाळा नं.१ अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर येथे बालविवाह निर्मूलन पालक प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता..देशात होणाऱ्या बालविवाहांपैकी महाराष्ट्रातील बालविवाहांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सोलापूर जिल्हा स्तरावरील अठरा वर्षांपूर्वी लग्न झालेल्या महिलांची टक्केवारी ४०.३ आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य,शिक्षण, ग्रामपंचायत विभागांमार्फत कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.बालविवाह रोखण्यासाठी तयार केलेल्या जिल्हा कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रशिक्षण घेतलेले शिक्षक उमेश फलटणकर यांनी बालविवाह होण्याची कारणे, त्याचे दुष्परिणाम व बालविवाह रोखण्यासाठी उपाय याबाबत मार्गदर्शन केले. मुलीचे लग्न १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी व मुलाचे लग्न २१ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी करू नये. त्यांची शारीरिक व मानसिक वाढ विवाहयोग्य झालेली नसते. यावेळी समूहसाधन केंद्र अकलूजचे केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात बोलताना ते म्हणाले की, बालविवाह होण्याला सर्वात जास्त जबाबदार असलेला घटक म्हणजे अल्पवयीन मुलींचे आई-वडील हेच असतात. आपल्या मुलीचे लग्न अल्पवयात करून खूप मोठी जबाबदारी पार पाडल्याचे असे आई-वडील मानतात. पण भविष्यात त्या मुलींची होणारी भावनिक कुचंबणा, शारीरिक त्रास व मानसिक ताण या बाबींना पालकांचा बेजबाबदारपणाच कारणीभूत ठरतो.भातुकलीचे खेळ खेळण्याच्या वयात मुलींना लग्नाच्या बंधनात अडकवू नका. फुलणाऱ्या कळ्यांना कोमेजू देऊ नका,अशी भावनिक साद त्यांनी उपस्थित पालकांना घातली. यावेळी बालविवाहाचे मुलींच्या भविष्यावर होणारे दुष्परिणाम ऐकून उपस्थित माता पालकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले. आम्ही आमच्या मुलींचे लग्न १८ वर्ष वय होण्यापूर्वी करणार नाही व समाजातील इतर लोकां मध्ये याबाबत जागृती करू असा निश्चय सर्व पालकांनी केला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अमृता सदाफुले व मुख्याध्यापक मोहन इंगोले यांनीही याबाबत महिलांशी हितगुज साधले. यावेळी व्यवस्थापन समिती , माता पालक संघ, शिक्षक पालक संघ यांचे सदस्य उपस्थित होते. महिला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पदवीधर शिक्षक कैलास गायकवाड यांनी केले तर आभार दत्तात्रय धाईंजे यांनी मानले.पालक प्रबोधन मेळावा यशस्वी करण्यासाठी सीमा सुरवसे, उज्वला भोसले व संतोष यादव यांनी विशेष सहकार्य केले.








