संत विचारच जगाला तारक : राज्यपाल कोश्यारी
मुंबई / प्रतिनिधी – संतांच्या सहवासाशिवाय देवाची प्राप्ती शक्य नाही . त्यामुळे संत विचार हेच जगाला तारक आहेत असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले . संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंती निमित्त भागवत धर्म प्रसारक समिती , पालखी सोहळा पत्रकार संघ व नामदेव समाजोन्नती परिषद आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान या २३०० किलोमीटर रथ व सायकल यात्रेचा वृत्तांत देण्यासाठी तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमात संत चरित्र आणि संत वांगमयाचा समावेश करावा या मागणीचे निवेदन देण्यासाठी योगी निरंजननाथ , अध्यक्ष सूर्यकांत भिसे , उपाध्यक्ष शंकर टेमघरे , सचिव ॲड विलास काटे व खजिनदार मनोज मांढरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची मुंबई राजभवनामध्ये भेट घेतली . श्री विठ्ठलाची मूर्ती व शाल देवून त्यांचा सन्मान केला . त्यांना घुमान रथ व सायकलवारीची माहिती दिली . त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडले . कोश्यारी म्हणाले , तुमच्या भेटीमुळे माझीही घुमान वारी झाली . मी धन्य झालो . संत नामदेवांच्या घुमान सायकल वारीमुळे ७०० वर्षानंतर त्यांचे विचार हे महाराष्ट्रासह गुजरात , राजस्थान , हरियाणा , पंजाब , उत्तरप्रदेश , मध्यप्रदेश आदी राज्यात पोहोचण्यास मदत झाली . त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार झाला . वारीमध्ये विठ्ठलाविषयीचा श्रध्दाभाव माहित होतो . आषाढी वारी म्हणजे केवळ गर्दी नव्हे तर ती एक आध्यात्मिक साधना आहे . निष्ठावंत वारकरी या वारीमध्ये तल्लीन होतो . ही वारकरी परंपरा जतन झाली पाहिजे .







