*उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्निक कार्तिकी एकादशीची महापूजा, साळुंखे दाम्पत्याला महापूजेचा मान*
सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते 4नोव्हेंबर रोजी पहाटे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा संपन्न झाली. पहाटे अडीच वाजता फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाच्या महापूजेला सुरुवात झाली होती.फडणवीस यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील उत्तमराव साळुंखे या दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला.आषाढी आणि कार्तिकी शासकीय महापूजेचा मान मिळणारे फडणवीस हे राज्यातील पहिले राजकारणी ठरले आहेत. आषाढी आणि कार्तिकीची पूजा करायला मिळाली ही पांडूरगांची कृपा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपुरात भक्तीचा महापूर आला आहे. चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाल्याचे चित्र आहे. पंढरपुरात हरी नामाचा जयघोष सुरू असून अवघी पंढरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे.







