*एमपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!*
नाशिक : एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 मधील नियोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली. शासन सेवेतील विविध पदांच्या भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन केले जाते. त्यानुसार 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.प्रस्तावित परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याचा विचार करण्यात आलेला आहे. तरी संबंधित संस्थांनी परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







