उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागावी -राज्य समन्व्यक योगेश केदार
अकलूज (प्रतिनिधी )सत्तांतर झाल की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे. असं वादग्रस्त वक्तव्य उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.उस्मानाबादमध्ये हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांची जीभ घसरली. सत्तांतर झाल्यावरच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे.तानाजी सावंत यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री तानाची सावंत यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बाब हलक्यात घेऊ नये. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक योगेश केदार यांनी सांगितले की, मंत्री सावंत यांनी आधी सकल मराठा समाजाची माफी मागावी. तानाजी सावंत यांनी मराठा समाजाने ओबीसी आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना तारतम्य बाळगावे. तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का? जर तुम्हाला उघड समाजाच्या भूमिकेसोबत येणे शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका. आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा.योगेश केदार म्हणाले, सत्तेची हवा डोक्यात जावू देऊ नका.आम्ही सामान्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाहीत. ‘मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण’ ही भूमिका कुणाही विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून घेतलेली नाही. तुमचे सरकार आले म्हणून आम्ही आंदोलने सुरू केली असे बिनबुडाचे आरोप करू नये. तुमचे सरकार आले म्हणून आंदोलन करण्याची खाज आम्हा मराठ्यांना आली इथपर्यंत बोलता? तुम्हाला नेमकं काय वाटतंय की काहीही बोलले तर समाज सहन करेल? सत्तेची हवा एवढी पण डोक्यात जाऊ देऊ नका. आणि हो ‘एससी’मधून आरक्षण द्या, अशी भूमिका मराठा समाजाने कधीच घेतली नव्हती. आणि भविष्यातही कधी घेणारही नाही. त्यामुळे असले काही बोलून पत घालवून घेऊ नका.योगेश केदार पुढे बोलताना म्हणाले, पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी सांगतो. आम्ही गेल्या सरकारवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गाजर आंदोलन केले. शरद पवार यांच्याविरोधात देखील खंजीर आंदोलन केले. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या देखील विरोधात खंजीर आंदोलन केले. अजित पवार यांना जाहीर भाषणात थांबवून ओबीसीमधूनच आरक्षण मागितले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधात असतानाही आम्ही त्यांच्या घरावर आंदोलन केले होते. हे तुम्हाला तर नक्की माहिती होते.तानाजी सावंत तुम्ही मूळ पक्ष सोडून जेव्हा गुवाहाटीला पळून गेले तेव्हा हाच सर्वसामान्य मराठा तुमच्या बाजूने उभा होता. म्हणून तुम्ही परत आल्यावर सुखासुखी नवीन सरकार स्थापन करू शकला. आजही तुम्ही सभा घेऊ शकत आहात. जर गाव गाड्यातला अन् महाराष्ट्रातला सामान्य मराठा तुमच्या विरोधात गेला असता तर तुम्हाला कुणी जगू देखील दिलं नसतं. आज शेवटचे सांगणे आहे, तुम्हाला जर एखाद्या विषयात काही माहिती नसेल तर बोलू नका. ओबीसी समाजातील नेत्यांच्या पेरलेल्या गोष्टी भाषणात बोलून मराठ्यांचा बुद्धिभेद करून समाजाचे नुकसान करू नका. ओबीसीमधून आरक्षण हे समाजाने दोन वेळा ठेच लागल्यानंतर संविधानाला साक्षी ठेऊन घेतलेली भूमिका आहे. आम्ही आजही तुमच्या बाबत सकारात्मक आहोत. पण पुन्हा जर ओबीसी आरक्षणाबाबत मराठा समाजानी घेतलेल्या भूमिकेबाबत काही बाही बोलायला जाल तर तुम्हाला त्याची फळे भोगावी लागतील.तानाजी सावंत यांच्या विषयी मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.तानाजी सावंत यांनी मराठा समाजाच्या ओबीसीमधून आरक्षण या भूमिकेला चुकीच्या पद्धतीने विरोध केला. आंदोलकांना विरोधी पक्षांनी सोडलेली पिलावळ, असे संबोधित केले. तसेच, आज ओबीसीतून आरक्षण मागत आहे दोन महिन्यांनी एससी मधून आरक्षण मागतील, असेही बोलले. त्यातून दलित समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. उलट दलित समाज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देतोय. कारण दलित समाजातील जाणकार नेत्यांना माहिती आहे की, मराठा समाज ‘एससी’चे आरक्षण मागत नाहीये. हे वास्तव तानाजी सावंत यांना माहिती नसावे.तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यावे. महाराष्ट्रातून त्यांना निवेदने पाठवली जातील. त्यांनीही या बाबीला हलक्यात घेतले तर त्यांच्यासहीत एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात मराठा समाज फिरू देणार नाही. प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल.असे योगेश केदार यांनी ठणकावून सांगितले आहे.







