*अजय तपकिरे ते शिवप्रताप गरूडझेप (अग्राहून सुटकेच्या ) थरारातील बहीर्जी नाईक ….!!!*
निरा नदीच्या अगदी काठावर गुरूनगर, अकलूजच्या परीसरात आर्थीकदृष्ट्या जेमतेम प्रपंच असलेल्या कुटुंबात जन्मलेला अजय राजाराम तपकिरे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालीका ते 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणारा शिवप्रताप गरूडझेप (अग्राहून सुटकेचा थरार) या बिगबजेट डॉ अमोल कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील बहिर्जी नाईक असा सेलीब्रिटी कधी झाला हे कळालेच नाही. लहानसे किराणा दुकान, वडिल आई दोघेही कष्ट करीत आठवडी बाजार करून खाणारे कुटुंब. कलेला गरीबी किंवा उच्चनिच्चता नसतेच मुळी. महाविद्यालयीन काळात एकांकीका करताना मिळालेले यश वाया जावु द्यायचे नाही या दृढनिश्चयाने सुरू केलेली अभिनयाची वाटचाल आज कुठेतरी स्थिर झालीय असे वाटते. फितुर तो चंद्र, त्याच्या भल्लरीची भैरवी, लाईफ ऑफ सेंकदस, ड्राय डे अशा अनेक एकांकीका करताना त्याच्यातला कलाकार त्याला स्वस्थ बसू देईना एकीकडे अभिनयाची आवड पण घरची स्थीती बेताचीच. महाविद्यालयीन स्पर्धात मिळत असलेली बक्षिसे त्यास खुणावू लागली होती. शिवाजी विदयापिठ युवा महोत्सवात बेस्ट अँक्टरचा मिळालेला पुरस्कार आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी एकांकीकांना मिळालेले पुरस्कार त्याच्यातल्या कलाकाराला जास्तच अस्वस्थ करू लागले होते. घर सोडावे तर ते शक्य नव्हते, तशातच वडिलांचे आजारपण सुरू झाले आणि त्यातच वडिलांचे झालेले निधन अजयला धक्का देेणारया होत्या. गरीबीला वाटा नसतात ती कोणत्याही वाटेने येतच असते लहान वयातच आईची व कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेवुन पुन्हा जिवनाच्या खऱ्या खुरया रंगमंचावरचा अभिनय सुरू झाला. आई शिलाई मशीनवर कपडे शिवायची व अजय किराणा मालाच्या दुकानात वस्तुची विक्री करीत बसायचा. पण नाटकाचे, सिनेमाचे वेड काही जात नव्हते. अकलुज मध्ये होत असलेल्या प्रताप क्रीडा मंडळाच्या एकांकीका स्पर्धा किंवा पु ल देशपांडे एकांकीका स्पर्धामध्ये हिररीने सहभागी व्हायचा. नियोजन, आयोजनात महत्वाची भुमीका पार पाडायचा. त्यातुनच गांधी ते गोध्रा, काजळमाया, मुद्रा भद्राय राजते अशा एकांकीका व नाटकांच्या माध्यमातून रंगमंचीय अभिनयाच्या जोरावर भक्कम होत गेला पण, अर्थकारण म्हणावे तसे सुधारत नव्हते. हळू हळू अभिनयाच्या बळावर व किशोर साव यांच्या माध्यमातून काही सिनेमामध्ये छोट्या मोठ्या भुमीका मिळाल्या. जावू तिथ खावू, एक गाव दहावी नापास, बरड, आंबट, विघ्नहर्ता महागणपती, एक अलबेला, मला एक चानस हवा, देव आवतारी बाळूमामा, मैत्री, आण्णा हजारे, व्हॉटसअप लंग्न अशा चित्रपटामध्ये छोट्या मोठ्या भुमीका त्यांनी साकारल्या. पण अभिनयाची चुणूक दाखविण्याची संधी मिळाली ती राजा शिवछत्रपती या डॉ.अमोल कोल्हेंच्या मालीकेत सर्जा जेधेंची भुमीका मिळाल्यानंतरच आणि हाच खरा आत्तापर्यंतच्या आयुष्यातील टर्नीग पाईंट म्हटले तरी हरकत नाही. हळू हळू दिवस पालटायला लागले. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाहही झाला. मा धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या सहकार्यातून अकलूजमध्ये सर्व प्रथम ड्रेपरीचा व्यवसाय करण्याचे काम सुरू केले. अभिनयाची बाजू सांभाळत, सांभाळत या व्यवसायात जम बसविला. मिळालेल्या भुमींकांच्या मानधनातून प्रपंचाची आर्थीक घडी बसली. एके दिवशी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मालीकेच्या ऑडीशनसाठी त्यांनी मुंबई गाठली अन् सुरू झाला प्रवास इतिहासात ज्यांचे खरे नावही निटसे माहीत नाही अशा स्वराज्याच्या पहिल्या गुप्तहेर खाते प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या भुमीकेचा. या मालीकेने अजयला नाव मिळवून दिले. भुमीका करण्यासाठी सर्वात जास्त मेकअप, गेटअप व तेव्हढ्याच वेगवेगळ्या भुमीका अजयने लिलया पार पाडल्या याच अभिनयाची पावती म्हणून अमोल कोल्हे यांनी पुन्हा त्यांच्या चित्रपटात बहिर्जी नाईक यांचीच व्यक्तिरेखा साकारण्याची पुन्हा एकदा संधी दिलीय 5 आक्टोंबर रोजी 2022 रोजी हा चित्रपट चित्रपट गृहात प्रदर्शित होतोय. इतिहासाच्या पुस्तकांचा अभ्यास करताना बहिर्जी नाईक आम्हाला कमी समजले असतील पण डॉ.अमोल कोल्हेंच्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालीकेतून अजय तपकिरे यांनी केलेल्या भुमीकेतून या ऐतीहासीक व्यक्तीरेखेला न्याय देताना आणि आत्ता पुन्हा चित्रपटातून आम्हाला समजतील असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जानेवारी २०१९ मध्ये मा. जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २३०० कलाकार असलेले रयतेचा राजा : राजा शिवछत्रपती या महानाट्याचे दिग्दर्शनही त्याने केले. मा. जयसिंह मोहिते पाटील , धैर्यशिल मोहिते पाटील, यांच्या प्रेरणेने अजय यशस्वीतेकडे वाटचाल करतोय. अजयच्या संपुर्ण या वाटचालीत किशोर साव सर, प्रमोद जोशी सर, जय उदय कलामंच, प्रताप क्रीडा मंडळ, शंकरराव मोहिते महाविद्यालय यांचेही महत्वाचे योगदान आहे.आपणा सर्वाना विनंती आहे कि ऐतिहासिक चित्रपटाच्या मांदियाळीतील वेगळ्या धाटणीचा विषय नेहमीच डॉ अमोल कोल्हे यांनी हाताळलेले आहेत त्यात आपला मित्र महत्वाच्या भुमीकेत आहे…तेव्हा आपण सर्वांनी हा चित्रपटचित्रपट गृहात जावून नक्की पहावा. चित्रपटाच्या सर्व टिमला मनपूर्वक शुभेच्छा
प्रा. विश्वनाथ आवड (सर )









