मुकुंद शहा यांना पितृशोक
इंदापूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी गोकुळदास (भाई) विठ्ठलदास शहा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन
मुकुंद शहा यांना पितृशोक
इंदापूर (प्रतिनिधी )इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष, तथा स्वर्गीय कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय इंदापूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी गोकुळदास (भाई) विठ्ठलदास शहा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गोकुळदास भाई शहा यांच्या निधनाने इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.गोकुळदास भाई शहा यांचा जन्म १० आँगस्ट १९३६ रोजी झाला. तेव्हापासून त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले. तालुक्यातील अनेक महत्वपूर्ण बाबींचे ते साक्षीदार ठरले. तालुक्याच्या राजकारणात तत्कालिन खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांचे ते खंदे निकटवर्तीय होते. कर्मयोगी भाऊ आणि भाई या जोडीने १९८० साली तालुक्यातील बिजवडीच्या माळावर वालचंदनगर येथील साखर कारखाना विकत घेऊन त्याचे सहकारात पुनर्ररोपण केले.या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या योगदानामुळे हा वटवृक्ष कायम बहरत गेला. यातुनचं तालुक्याला वैभवप्राप्ती झाली. साधी राहणी व उच्च विचारसरणी महात्मा गांधी व स्वातंत्र सैनिक दिवंगत नारायणदास रामदास शहा यांचे संस्कार यामुळे एखाद्या तपस्वी प्रमाणे भाईंनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांच्या जीवनपटावर आधारित ‘भाई आणि आम्ही’ या पुस्तकाचे शब्दांकन त्यांचे पुत्र इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शाह यांनी केले आहे.इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून तालुक्यात शिक्षणाची दारे उघडण्यात भाईंचा सिंहाचा वाटा आहे. यासोबत वडिलोपार्जित आलेला व्यापारी वसा त्यांनी तंतोतंत जपला. अल्पावधीतचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक प्रसिद्ध व्यापारी म्हणून शहा कुटुंब नावारुपाला आले. यात भाईंचं मोठं योगदान आहे. या सर्व बाबींमुळेचं इंदापूर तालुक्याच्या राजकारणात भाई हे नांव कायमचं चर्चेत राहिले.नुकतचे मागील महिन्यात ४ आँगस्ट २२ रोजी भाई यांच्या पत्नी शकुंतला शहा यांचे निधन झाले होत. भाई यांच्या पाश्चात्त्य तीन मुले, मुली, सुना, नात सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा या भाईंच्या सुनबाई. तर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांचे ते वडील तर कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांचे ते चुलते होते.










