*सदाशिवराव माने विद्यालयाचे उपप्राचार्य संजय राऊत सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ.*
–संग्रामनगर दि.३ (केदार लोहकरे याजकडून)अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाचे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे उपप्राचार्य संजय तुकाराम राऊत हे दिनांक 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले.त्यानिमीत्त त्यांचा आणि त्यांच्या पत्नी सौ.शिवकांता चिरंजीव उन्मेष व थोरल्या सुनबाई सौ.मोनिका यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्री.राऊत यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक राज्यस्तरीय समित्यांवर काम केले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे अंतर्गत कृषी विषय अभ्यास मंडळ सदस्य,सहनिमंत्रक व लेखक मंडळ सदस्य म्हणून जवळपास 15 वर्षे काम पाहिले आहे.बालभारती तथा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांच्या अंतर्गत कृषी विषय अभ्यास समितीत निमंत्रक आणि कृषी विषय लेखक समितीत अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.त्याच प्रमाणे व्यवसाय अभ्यासक्रमासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,मुंबई यांचे लेखक मंडळासाठी कार्य केले आहे. त्यांनी गेले 20 वर्ष अभ्यासक्रम निर्मिती आणि पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यांनी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या अनेक उपक्रमांमध्ये काम केले आहे.बुद्धिबळ तसेच हॉलीबॉल या क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काम पाहिले आहे.बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.यापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांसाठी ही वर्तमानपत्रातून लेख ही लिहिलेले आहेत,तसेच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे.त्यांना एज्युकेशन एक्सलन्स अवार्ड,ऍग्रो केअर आयडॉल अवॉर्ड व वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.शिक्षण क्षेत्रात त्यांनी जवळपास ३४ वर्षे काम केले व ते ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले आहे.यापुढेही शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्वसामाजिक,संशोधन व अभ्यासक्रम निर्मिती,पाठ्यपुस्तक निर्मिती संस्थांसाठी काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विद्यालय,कृषी वर्गमित्र परिवार व इतर मित्र परिवार, नातेवाईक आणि विद्यार्थी, आजी माजी सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक यांनी सत्कार समारंभ घडवून आणले,त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत. विद्यालयातील सत्कार समारंभास उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे आजी-माजी शिक्षक यामध्ये प्रामुख्याने व्यवसाय विभागाचे माजी उपप्राचार्य सुभाष दळवी,माजी उपप्राचार्य नारायण माने,वसंतराव जाधव,मुख्याध्यापक प्रतापराव पाटील आणि उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे विद्यार्थी हे उपस्थित होते. श्री राऊत यांचे सर्व निकटवर्तीय नातेवाईक याप्रसंगी उपस्थित होते.













