*मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुनगंटीवारांचं मोठं विधान!*
चंद्रपूर : येत्या काही दिवसांत राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. तसेच यावेळी 23 मंत्र्यांची भर पडू शकते, अशी माहिती भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्रात 288 विधानसभा सदस्य आहेत. त्यानुसार 43 मंत्री होतात. या क्षणाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धरुन भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 9 असे एकूण 20 मंत्री आहेत. तसेच नवे 23 मंत्री आणखी भविष्यात होतील. या विस्तारात शिवसेना आणि भाजपच्या अनेक आमदारांना संधी प्राप्त होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.दरम्यान या विस्तारात शिंदे गटातील कोण-कोणत्या आमदाराला मंत्रिपद मिळणार? अपक्षांचाही विचार होणार का? मंत्रिमंडळात महिलांचा समावेश असेल का? हे लवकरच कळेल. तसेच मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही वेगळं चित्र निर्माण होतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.







