*दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त १५ ऑगस्टला अकलूजमध्ये ५० पँथर्सचा सन्मान सोहळा*सामाजिक जाणिवेतून साप्ताहिक बंडखोर व अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी ): ज्यांनी दलित समाजावरील अन्याय अत्याचाराविरोधात लढताना लाठ्या-काठ्या खाल्ल्या, अंगावर केसेस घेऊन जेल भोगले त्या पँथर्सकडे काही प्रमाणात समाजाचे दुर्लक्ष झाल्याने दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून दिनांक १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता साप्ताहिक बंडखोर व अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ५० पँथर्सचा सन्मानचिन्ह, फेटा व हार देऊन अन्नपूर्णा मंगल कार्यालय अकलूज याठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात दलितांवरील अन्याय अत्याचाराने थैमान घातलेले असताना त्यांच्या संरक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावून दलित पँथर्सनी जातीयवादी प्रवृत्तींशी अविरतपणे संघर्ष केला. यादरम्यान अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली, तरीही ते डगमगले नाहीत. आपल्या संसाराची व जीवाची पर्वा न करता त्यांनी दलितांसाठी स्वतःला वाहून घेतले होते हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना कधीही विसरता येणार नाही. म्हणूनच आम्ही सामाजिक बांधिलकी मानून दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून अशा या लढाऊ पँथर्सचा सन्मान आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती अकलूजचे अध्यक्ष व भाजपाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील भूषविणार आहेत, तर उद्घाटक म्हणून श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. यशवंतराव कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विचारवंत भीमराव चंदनशिवे हे दलित पँथरच्या संघर्षाचा आढावा घेणार आहेत. तरी या कार्यक्रमास माळशिरस तालुक्यातील सर्व पक्ष-संघटनांनी उपस्थित रहावे असे आवाहन साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम भंडारे यांनी केले आहे.









