*मंत्रिमंडळ विस्तारावर चित्रा वाघ संतापल्या…
*मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. दरम्यान वादग्रस्त आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेत्या चित्रा यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. त्यांनी राठोड यांना मंत्रीपद देणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं. राठोड यांनी शपथ घेतल्याच्या काही मिनिटांत चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया नोंदवली.चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे.”बीड जिल्ह्यातील 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. त्यामुळे राठोड यांना आपलं मंत्रिपद सोडावं लागलं होतं. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना राठोड यांना पोलिसांनी क्लीन चीट दिली होती, त्यामुळे त्यांना स्थान देण्यात आलं. जर यावर कोणाचं काही म्हणणं असेल तर ते ऐकून घेतलं जाईल असंही शिंदे यांनी सांगितलं.







