*’मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं’*
पनवेल : आपण मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते पनवेलमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या आयोजित बैठकीत बोलत होते. या बैठकीला भाजपचे अनेक नेते उपस्थित आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षातील खदखद समोर आल्याची सर्वत्र जोरदार चर्चेला उधान आलं आहे. ते म्हणाले की, आम्ही सर्वांनी मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्त्वानं घेतला आहे. या निर्णयामुळं आपल्याला दुःख झालं आहे. एवढं मोठं दुःख पचवून आपण सर्वजण पुढे गेलो असल्याची खदखद पाटील यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. पुढे पाटील पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षं यशस्वीपणे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली आहे. मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. मात्र केंद्रीय नेतृत्त्वाचा आदेश आल्यानंतर तो मान्य करुन फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्याचं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं आहे.







