*यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी कोणत्याही निर्बंधाविना*मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यंदा गणपती उत्सव आणि दहीहंडी कोणत्याही निर्बंधाविना पार पडणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या वर्षी दहीहंडी साजरी करताना नियम पाळा, तसेच गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नाही, याबरोबरच गणेशोत्सवाच्या मिरवणुका आणि दहीहंडी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करा, मात्र कोर्टाच्या नियमांचे पालन करा, असे शिंदे म्हणाले आहेत. याबरोबरच या गणेशोत्सवा दरम्यान, एसटीच्या जास्त गाड्या सोडण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहेत. तसेच गणपती मंडळांना परवानग्या देण्यासाठी खिडकी योजना आणि ऑनलाईन परवानग्या देण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.दरम्यान, मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधामुळे सण उत्सव धूम धडाक्यात साजरे करता येत नव्हते, त्यामुळे नागरिकांमध्ये देखील काहीसा हिरमोड होता. मात्र यंदा सण उत्सव धूम धडाक्यात साजरे करता येणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे







