*भाजपा बरोबर युतीसाठी ठाकरे-मोदींमध्ये एक तास चर्चा; खासदार शेवाळेंचा गौप्यस्फोट*
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत गेल्या महिन्यात एक तास चर्चा झाली होती. ठाकरे हे भाजबरोबर युती करण्यास उत्सुक होते, असा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. खासदार राहुल शेवाळे हे आज दिल्लीत पत्रकार परिषेदेत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. याबरोबरच त्यांनी उद्धव ठाकरे आणि भाजप सोबतच्या युतीबाबतचे अनेक गौप्यस्फोट केले आहेत. आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे हे भाजपबरोबर युती करण्यास उत्सुक होते, त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर याविषयी जून महिन्यात चर्चा झाली होती, तसेच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना भाजप सोबत युती करण्यासाठी ग्रीन सिग्नल देखील दिला होता, असं देखील ते म्हणाले आहेत. या बरोबरच युतीबाबत उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाली होती, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. मात्र या युतीमध्ये संजय राऊतांनी खोडा घातला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.एवढंच नाही तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर भाजपबरोबर युती करू, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले होते, असा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. तर शिवसेनेच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद या भावना गवळी आहेत. त्यामुळे त्यांचाचं व्हिप सर्व खासदारांना लागू असणार आहे, असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, दिल्लीत पार पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोठे गौप्यस्फोट केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चना उधाण आलं आहे.







