*शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच दिला होता, फडणवीस यांचा खुलासा*
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत झाले. मोठी रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेत घेत फडणवीस यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतचा खुलासा केला आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच वरिष्ठ नेत्यांना दिला होता, असे फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आज प्रथमच त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच नागपूरमध्ये आले. त्यांचे आज नागपूरमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारबाबत मोठा खुलासा केला आहे. 2019 ला भाजपचे जास्त आमदार निवडून आले होते. तरी देखील राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. त्यामुळे राज्यात लोकांना देखील हे मान्य नव्हतं. त्यामुळे मीच दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून हे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यामुळेच आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र या सरकारमध्ये सामिल व्हायचं नाही हे मी ठरवलं होतं, पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि अमित शाह यांच्या निर्देशानेच मी सरकारमध्ये सामिल झालो असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.







