*उद्या बहुमत चाचणी; राज्यपालांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र…*
मुंबई : राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची घडामोड समोर आली आहे, ती म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले की, मी उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईला जाणार आहे. राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ असणार आहे. तर या चाचणी प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे.मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीनंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. सरकारने बहुमत गमावल्याचा दावा भाजपने केला आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपालांना एक ई-मेलच्या माध्यमातून बंडखोर आमदारांनी पत्र दिलं आहे. शिवसेनेचे 39 आमदारांनी बंडखोरी केली असून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत रहायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निकालांचा अभ्यास करुन राज्यपाल त्यांना योग्य ते निर्देश देतील अशी आशा आम्हाला आहे.







