*सपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; रामपूर, आझमगडमध्ये भाजप विजयी*
लखनऊः लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागेसाठी पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सपाच्या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे. आझमगड आणि रामपूर या लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या आहेत. या दोन्ही जागा एकेकाळी सपासाठी खास होत्या. या निवडणुकीत सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांना हा मोठा झटका बसला आहे. त्या ठिकाणी कायमच सपाचे उमेदवार निवडून येत होते. आझमगड मतदारसंघातून भोजपुरी सुपरस्टार आणि भाजप उमेदवार दिनशलाल यादव निरहुआ यांनी विजय मिळविले आहे. निरहुआ यांनी समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव यांना ८ हजारहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला. तर रामपूर लोकसभेच्या जागेवर भाजपचा उमेदवार विजयी झाला. भाजपच्या घनश्याम लोधी यांनी सपाचे उमेदवार आसिम राजा यांचा तब्बल ४२ हजार मतांनी पराभव केला. आझमगड मतदारसंघातून अखिलेश यादव आणि रामपूर मतदारसंघातून आझम खान हे निवडून आले होते. पण दोघांनीही या जागा सोडल्याने दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक लागली होती. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही जागेवरील विजय एेतिहासिक असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. २०२४ च्या निवडणुकीसाठी हा मोठा संदेश असल्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघात शिरोमणी अकाली दलाच्या सिमरनजीत सिंह मान यांनी विजय मिळविला आहे. आपचा उमेदवार गुरमेल सिंह दुसऱ्या स्थानावर राहिले. तर काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भाजपचा उमेदवार अनामत रक्कम वाचवू शकला नाही. भगवंत मान हे मुख्यमंत्री झाल्याने लोकसभेची जागा रिक्त झाले होते. या पराभवाने मुख्यमंत्री मान यांना मोठा झटका बसला आहे. त्रिपुरात तीन जागा भाजपला, एक जागा काँग्रेसला चार राज्यातील सात विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या जागांसाठी २३ जूनला मतदान झाले होते. त्यात दिल्लीतील राजेंद्रनगर मतदारसंघातून आपने विजय मिळविला. तर त्रिपुरात चार जागेपैकी तीन जागांवर भाजपचा उमेदवार, तर एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. तर आंध्रप्रदेशमधील एका जागेवर वायएसआर काँग्रेसने विजय मिळविला. झारखंडच्या मांडर सीटवर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.







