*एकनाथ शिंदेंनी फोटो शेअर करत केले शक्तिप्रदर्शन*
गुवाहाटीः शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथून आमदारांबरोबर असलेले फोटो शेअर करत शक्तिप्रदर्शन केले आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह 42 आमदार असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.त्यामुळे आता आगामी दिवसात मोठ्या राजकीय हालचाली होऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतरही शिवसेना आमदारांची बंडखोरी शमली नाही. आज सकाळी आणखी चार आमदार गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. रामटेकचे शिवसेना समर्थक आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार आज शिंदे यांच्या गटात सामिल झाले. त्यानंतर आज एकनाथ शिंदे गटाने एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले. एकनाथ शिंदे गटाकडून प्रसिद्ध केलेल्या फोटोमध्ये शिवसेनेचे 35 आमदार दिसत आहे. तर 7 अपक्ष आमदार असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी आणखी चार आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे आणखी चार आमदार कोण आहेत, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. आज, मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे 17 आमदार उपस्थित होते.







