*आता देवेंद्र फडणवीसही नॉट रिचेबल…सत्तेचा नवा प्रयोग आखणार?*
मुंबई : राज्यातील सरकारमध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या माध्यमांसाठी ‘नॉट रिचेबल’ असले तरी सत्तेचा नवा प्रयोग यशस्वी करण्यासाठी रणनीती आखत आहेत. मलबार हिलवर समुद्राला लागून फडणवीस यांचा सागर हा बंगला सध्या गोपनीय हालचालींचे केंद्र बनला आहे. सत्तेची स्क्रिप्ट ते लिहीत आहेत. राज्यसभा, विधान परिषदेतील विजयानंतर मुख्यमंत्रीपदावर त्यांची नजर आहे. फडणवीस-अजित पवार प्रयोग फसला. राजस्थानमध्येही आपटी खावी लागली. त्याची पुनरावृत्ती होऊ नये हे पाहिले जात आहे. नियोजन त्यांनी खूप आधीपासून केलेले होते, पण कुठेही त्याची वाच्यता न करण्याचे भान त्यांनी बाळगले.विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या रात्री भाजपच्या आमदारांना ते एवढेच म्हणाले की उद्याची निवडणूक जिंकणे ही राज्यात आपली सत्ता येण्यासाठीची शेवटची पायरी असेल. त्यांच्या या वाक्यामागे पुढचे एवढे मोठे राजकीय स्फोट लपलेले असावेत हे आमदारांच्याही लक्षात आले नव्हते.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि स्वत: फडणवीस या चौघांनाच काय चालले आहे? आणि काय करायचे आहे याची कल्पना आहे. दिल्लीतून आलेले आदेश अंमलात आणण्यास महाराष्ट्रातील ज्यांची गरज असते फक्त त्यांनाच बोलावून फडणवीस बंद दरवाजात चर्चा करतात. बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे मित्र आहेत. या मैत्रीतूनच सत्ता काबीज करण्याची चिन्हे आहेत. दोघांमध्ये सातत्याने चर्चाही होत आहे. फडणवीस १६० च्यावर संख्याबळ नेण्याचा फॉर्म्युला तयार करत आहेत.







