रामकृष्णहरी… वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी! अकलूजच्या मारुती मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भक्तिमय उत्साहात प्रारंभ

अकलूज (प्रतिनिधी) :“रामकृष्णहरी… वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी…” या भक्तिरसपूर्ण वातावरणात अकलूज येथील जुन्या ग्रामपंचायतीजवळील शिवापूर पेठेतील श्री मारुती मंदिरात सालाबादप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झालेल्या या सप्ताहामध्ये परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असून मंदिर परिसरात सध्या भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

सप्ताहामध्ये दररोज पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत काकडा आरती आयोजित करण्यात येत आहे. त्यानंतर सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत श्रीहनुमान महाअभिषेक व विष्णुसहस्रनाम स्तोत्र पठण होत आहे. सकाळी ८ ते १२ या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुरू असून भाविक मोठ्या श्रद्धेने या पारायणामध्ये सहभागी होत आहेत.
दुपारच्या वेळी आरती व विश्रांतीनंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हरिपाठ व भजनाचा भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सप्ताहातील विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मारुती मंदिर परिसरात दिवसभर भक्तिरसाचा दरवळ अनुभवायला मिळत आहे .शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पारायणाची समाप्ती करण्यात येणार असून यावेळी पारायणातील सर्व वाचकांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे.
त्याच दिवशी रात्री १० ते १२ या वेळेत ह.भ.प. माऊली महाराज अडसुळे यांचे भगवान श्रीकृष्णाच्या जन्मकाळावरील श्रवणीय कृष्णजन्माष्टमी कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
तसेच शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. अजित महाराज कुरुळे सर यांचे काल्याचे श्रवणीय कीर्तन होणार असून त्यानंतर भाविकांना प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भक्तिमय सोहळ्याची सांगता रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्रीहनुमान ग्रामप्रदक्षिणा अर्थात रथोत्सव तसेच मारुती रथ भंडारा या कार्यक्रमांनी होणार आहे
.या सप्ताहामध्ये विशेष म्हणजे अलीकडच्या काळात मोबाईलच्या आहारी गेलेली तरुण पिढी पुन्हा पारंपरिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांकडे आकर्षित होत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.
मारुती मंदिर चौक व अकलूज परिसरातील मोठ्या संख्येने तरुण या सप्ताहामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून त्यांचा सहभाग या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरत आहे.

“परमार्थ हा तरुणपणामध्येच करावा,” असे मत सप्ताह प्रमुख श्री. दिपराज फत्तेसिंह माने देशमुख यांनी व्यक्त केले. तरुण पिढीने धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरांशी जोडले जावे आणि आपल्या संस्कृतीचे जतन करावे, हा या सप्ताहामागील महत्त्वाचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
“एकट्याचा नव्हे खेळ । म्हणूवुनी जमविला गोपाळांचा मेळ ।।” या ओवीप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन, मिळून-मिसळून आणि शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यास कोणताही उपक्रम यशस्वी होतो, याचे उत्तम उदाहरण अकलूजच्या मारुती मंदिरातील हा सप्ताह सोहळा असल्याचे दिसून येत आहे
.ग्रामस्थांचे सहकार्य, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग आणि उत्तम नियोजनामुळे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उल्हासात, भक्तिभावात आणि आनंदमय वातावरणात साजरा होत आहे.
तरी अकलूज व परिसरातील सर्व भाविकांनी या विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताह प्रमुख श्री. दिपराज फत्तेसिंह माने देशमुख आणि श्री. विनायक भारत चव्हाण यांनी केले आहे.






