माळशिरसमध्ये एसीबीची मोठी कारवाई; ५ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना दोघे खासगी इसम रंगेहाथ ताब्यात अकलूज पोलीस ठाण्यातील गुन्हा, अटकपूर्व जामीन आणि आई-वडिलांना अटक न करण्यासाठी २५ लाखांपासून लाखोंच्या लाचेची कथित मागणी; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
माळशिरस, दि. २९ : अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी आणि काही कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे युनिटने मोठी सापळा कारवाई केली आहे.
या कारवाईत ५ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन खासगी इसमांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून, दोन पोलीस हवालदारांसह एकूण चौघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे
.या प्रकरणामुळे माळशिरस-अकलूज परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून लाखो रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपामुळे हे प्रकरण विशेष चर्चेत आले आहे.
३७ वर्षीय लायसन्स कन्सल्टंटची एसीबीकडे तक्रारएसीबीच्या अधिकृत प्रेसनोटनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हा ३७ वर्षीय लायसन्स कन्सल्टंट आहे.

त्याने २१ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार, तक्रारदाराचे भाऊ आणि इतर व्यक्तींविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदार अनिल महादेव शिंदे यांनी स्वतःसाठी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या नावाने २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदाराने ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्या भावाविरुद्ध व इतर व्यक्तींविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६४/२०२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अटकपूर्व जामीन आणि कायद्यातील कलमांसाठीही पैशांची मागणी?
तक्रारीतील माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी तसेच पीसी अँड पीएनडीटी कायद्यातील काही कलमे न लावण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
या संदर्भात एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. २४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या पडताळणीत खासगी इसम आबा सावळा वळकुंदे याने २५ लाख रुपयांची मागणी केल्याचे तसेच त्यापैकी १० लाख रुपये स्वीकारल्याचे कथितरीत्या मान्य केल्याचा उल्लेख एसीबीच्या प्रेसनोटमध्ये करण्यात आला आहे.
आई-वडिलांना अटक न करण्यासाठी ५.५० लाखांची कथित मागणीया प्रकरणात पुढे आणखी गंभीर आरोप समोर आल्याचे एसीबीने म्हटले आहे.
२७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या पुढील पडताळणीत, तक्रारदाराच्या आई-वडिलांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यासाठी एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे एसीबीने नमूद केले आहे.
यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने ५ लाख रुपये आणि पोलीस हवालदाराच्या नावाने ५० हजार रुपये, अशी एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
एसीबीच्या म्हणण्यानुसार, या लाचेच्या मागणीस पोलीस हवालदार राहुल मारुती वाघ यांनी अपप्रेरणा दिल्याचेही पडताळणीदरम्यान समोर आले आहे.
पिलीव रोडवरील ब्रिजखाली एसीबीचा सापळा
तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने २८ ऑगस्ट २०२६ रोजी सापळा कारवाई आयोजित केली.माळशिरस येथील पालखी महामार्गावरील पिलीव रोडच्या ब्रिजखाली, जानकर प्लॉटजवळ पंचांसमक्ष ही कारवाई करण्यात आली.
यावेळी ५ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन खासगी इसमांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत—१) आबा सावळा वळकुंदे (वय ४८)रा. वळकुंदे मळा, ६१ फाटा, ता. माळशिरस, जि. सोलापूर.२) महादेव पंढरी माने (वय ३९)रा. मोटेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर.हे दोघे खासगी इसम असल्याचे एसीबीच्या प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे
.दोन पोलीस हवालदारांचाही समावेश
या प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये—३) अनिल महादेव शिंदे — पोलीस हवालदार, बकल नंबर १६५९, अकलूज पोलीस ठाणे.४) राहुल मारुती वाघ — पोलीस हवालदार, बकल नंबर १८१८, माळशिरस पोलीस ठाणे.अशा एकूण चार जणांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा
या प्रकरणात आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७, ७-अ आणि १२ अन्वये माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे.
एसीबीच्या अधिकृत नोंदीनुसार, आरोपी क्रमांक १ आणि २ यांना २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता ताब्यात घेण्यात आले आहे
.एसीबीच्या पुणे युनिटची कारवाईया सापळा कारवाईचे नेतृत्व निता मिसाळ, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले.कारवाईवर सतीश वाळके, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., पुणे यांचे पर्यवेक्षण होते.सापळा पथकात मिथुन म्हात्रे, राजेश बाटे, प्रवीण तावरे, अश्विन कुमकर, दगडू सोनावणे आणि चंद्रकांत कदम यांचा समावेश होता.
या कारवाईस पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
परिसरात जोरदार चर्चा
या कारवाईमुळे माळशिरस आणि अकलूज परिसरात पोलीस यंत्रणेशी संबंधित कथित लाचखोरीच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे
. विशेषतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करून मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाकडे नागरिक आणि विविध स्तरांतून गांभीर्याने पाहिले जात आहे.
मात्र, एसीबीच्या तक्रारीतील आणि तपासातील आरोपांची अंतिम सत्यता पुढील तपास व न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे
.एसीबीच्या या कारवाईनंतर अकलूज-माळशिरस परिसरातील कथित लाचखोरीच्या प्रकरणांना आळा बसेल का आणि नागरिकांकडून होणाऱ्या अशा तक्रारींवर अधिक प्रभावी कारवाई होईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






