ब्रिटिशकालीन एस्केप अखेर सुरू; हजारो शेतकऱ्यांना दिलासा चंद्रकांत जाधव यांच्या दीड वर्षांच्या पाठपुराव्याला यश; मळोली ओढ्यावरील पाण्याचा प्रवाह सुरू
माळशिरस :(महादेव काळे )पिलीव येथील कॅनलला असलेला ब्रिटिशकालीन ‘एस्केप’ गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने पिलीव, कुसमोड, मळोली, शेंडेचिंच, धानोरे व तोंडले-बोंडले परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
अखेर पिलीव जिल्हा परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, सोमवारी (दि. २४) हा एस्केप सुरू करण्यात आला
.एस्केप सुरू झाल्याने मळोली ओढ्यावरील पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला असून, परिसरातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दीड वर्षापासून जाधव यांनी या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही त्यांनी प्रश्न मांडून एस्केप सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पाठपुराव्यामुळे संबंधित यंत्रणेने हा प्रश्न मार्गी लावला.
दरम्यान, एस्केप सुरू करण्याच्या वेळी मळोली व पिलीव येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एस्केपमधून पाण्याचा प्रवाह सुरू होताच उपस्थित शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
त्यामुळे कुसमोड, मळोली व शेंडेचिंच परिसरातील हजारो शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांचा दीर्घकाळचा प्रश्न मार्गीगेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला ब्रिटिशकालीन एस्केप सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
दीड वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.






