*सीमेवरील जवानांसाठी आसबेवस्तीच्या चिमुकल्यांची राखी*
प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
फळवणी, ता. माळशिरस : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी आसबेवस्ती, फळवणी येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या बालचिमुकल्यांनी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांसाठी प्रेमाने राख्या पाठवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
देशाच्या सीमेवर अहोरात्र जागून भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या आकर्षक राख्या जवानांना पाठवल्या.
या राख्यांसोबत विद्यार्थ्यांनी *“तुम्ही सीमेवर जागता म्हणून आम्ही सुरक्षितपणे शिकतो, खेळतो आणि आनंदाने सण साजरे करतो*,” असा भावस्पर्शी शुभेच्छा संदेशही पाठविला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात *देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सैनिकांप्रती आदर आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांची रुजवणूक झाली*.
चिमुकल्यांच्या या प्रेमळ उपक्रमातून रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता देश आणि देशरक्षक यांच्यातील भावनिक नाते जपणारा ठरला.
शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक, अंगणवाडी सेविका, मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी हा उपक्रम उत्स्फूर्तपणे पूर्ण केला.
“सीमेवर तुम्ही जागता, म्हणून आम्ही सुरक्षित झोपतो,” या भावनेतून विद्यार्थ्यांनी आपल्या वीर जवानांना मनःपूर्वक सलाम केला.






