नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी
इंदापूर :(प्रतिनिधी )स्वतःला ओबीसी नेता म्हणून घेणारे नवनाथ वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या कथित आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्याविरोधात सकल मराठा समाज, इंदापूर तालुक्याच्या वतीने इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
संबंधित वक्तव्यामुळे समाजात तेढ, द्वेष व वैमनस्य निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे
.तक्रार अर्जानुसार, एका प्रसारमाध्यमातील मुलाखती अथवा चर्चेदरम्यान नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजातील महिला व मुलींचा सार्वजनिक अवमान झाला असून, दोन समाजांमध्ये सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे.अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजामध्ये गैरसमज, द्वेष आणि वैमनस्य वाढण्याची शक्यता असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता तक्रारदारांनी व्यक्त केली आहे.
महिलांच्या सन्मानाबाबतही संबंधित वक्तव्य गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित वक्तव्याची सत्यता व संदर्भ तपासावा, तसेच लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार नवनाथ वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा समाज, इंदापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.






