सरपंच नाही, ग्रामसेवक नाही, पोस्टमनही नाही; भंडी शेगावच्या ग्रामस्थांची गैरसोय
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव येथे ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त असून, प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामसेवकांचा कार्यकाळ संपल्याने ग्रामस्थांची प्रशासकीय कामांसाठी मोठी गैरसोय होत आहे.
त्यातच गावात पोस्टमनही उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.ग्रामपंचायत कार्यालयात दाखले, विविध नोंदी तसेच शासकीय योजनांशी संबंधित कामांसाठी नागरिक दररोज जात आहेत.
मात्र संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. “
आमची कामे कोणाकडे न्यायची, हेच कळत नाही,” अशी खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.सरपंच पद रिक्त झाल्यानंतर तसेच ग्रामसेवकाची नियुक्ती नसल्याने ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.
जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, पेन्शन यांसारख्या विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि गरजू नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे
.या समस्येकडे पत्रकार संतोष कांबळे यांनी लक्ष वेधले असून, भंडी शेगावमधील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
ग्रामस्थांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, ग्रामस्थांकडून पंचायत समिती पंढरपूरचे गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार, पंढरपूर यांच्याकडे लेखी निवेदन देण्याची तयारी करण्यात येत आहे
. ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रशासक व ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






