अकलूज पोलिसांची प्रभावी कारवाई : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपींना शिक्षा
अकलूज (, प्रतिनिधी) : अकलूज पोलिसांनी तपास केलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय, माळशिरस यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाईचा संदेश गेला आहे
.प्राप्त माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२३ रोजी फिर्यादीने आपल्या अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
मुलगी आपल्या भावाकडे जाण्याचे सांगून माळशिरस येथे आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती अकलूज येथे देवदर्शनासाठी गेली असताना अद्याप घरी परतली नव्हती.
२० नोव्हेंबर २०२३ रोजी आरोपी अमर रहीम शेख याने पीडितेला तिच्या भावाकडून घरी सोडण्याचे सांगून अकलूज येथून आपल्या ताब्यात घेतले.
त्यानंतर आरोपीने तसलीम ताजुद्दीन शेख याची मदत घेत पीडितेला मोटारसायकलवरून माळशिरस बसस्थानकावर आणले.
त्यानंतर आरोपींनी पीडितेला सातारा, गणपतीपुळे आणि विशाळगड या विविध ठिकाणी नेले. २० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२३ या कालावधीत विविध हॉटेल, लॉज व इतर ठिकाणी ठेवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले
.या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक गणेश बी. चौधरी यांनी करून जिल्हा व सत्र न्यायालय, माळशिरस येथे दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदारांची तर बचाव पक्षातर्फे २ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.
सर्व पुरावे आणि साक्षी विचारात घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरविले. त्यानुसार,आरोपी तसलीम ताजुद्दीन शेख यास भारतीय न्याय संहिता कलम 363 सह 34 अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी व ₹३,००० दंड; दंड न भरल्यास ६ महिन्यांचा साधा कारावास.आरोपी अमर रहीम शेख यास कलम 363 सह 34 अंतर्गत २ वर्षे सक्तमजुरी व ₹३,००० दंड; दंड न भरल्यास ६ महिन्यांचा साधा कारावास.तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम, कलम ४ अंतर्गत २० वर्षे सक्तमजुरी व ₹७,००० दंड, दंड न भरल्यास ६ महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.
या खटल्यामध्ये पीडिता, तिची आई (फिर्यादी), फिर्यादीचा भाऊ, दोन वैद्यकीय अधिकारी, संबंधित लॉज व हॉटेल मालक तसेच तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
या तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, पोलिस निरीक्षक निरज उबाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
सरकार पक्षातर्फे अॅड. संग्राम एस. पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
कोर्ट पॅरवीसाठी पो. हे. कॉ. आर. एम. तांबोळी व पो. कॉ. के. एस. हंगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रकरणातील यशस्वी तपासामुळे अकलूज पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत असून, महिलांवरील व बालकांवरील गुन्ह्यांबाबत कठोर कारवाईची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.






