भरधाव दुचाकींनी अकलूज परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात; क्लासेस चालकांचे दुर्लक्ष कधी थांबणार?
अकलूज :(प्रतिनिधी )अकलूज, माळेवाडी, यशवंतनगर आणि संग्रामनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर खासगी क्लासेस सुरू आहेत. सकाळी आणि संध्याकाळी या क्लासेसना विद्यार्थी-विद्यार्थिनी दुचाकींवरून ये-जा करतात.
मात्र, काही विद्यार्थी भरधाव वेगाने दुचाकी चालवत असल्याचे चित्र सातत्याने दिसून येत असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.याच वेळेत ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, लहान मुले तसेच तरुण-तरुणी मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी रस्त्यांवर असतात. अशा वेळी भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकींमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत असतानाही या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही विद्यार्थ्यांकडून वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत असून, वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते.
वेळेतच यावर नियंत्रण आणले नाही, तर एखादी गंभीर दुर्घटना घडल्याशिवाय संबंधित यंत्रणा आणि जबाबदार घटक जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत
.विशेष म्हणजे, अनेक क्लासेस निवासी वस्त्यांमध्ये आणि अरुंद रस्त्यांलगत सुरू असल्याने या समस्येची तीव्रता अधिक वाढत आहे. त्यामुळे क्लासेसच्या वेळेत वाहतूक शिस्तीचे पालन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे
.खासगी क्लासेसच्या संचालकांनी विद्यार्थ्यांना शिस्त, वाहतूक नियमांचे पालन आणि मर्यादित वेगात वाहन चालविण्याबाबत सक्त सूचना देणे ही काळाची गरज बनली आहे.
तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून जबाबदार वाहनचालक बनविण्याची भूमिका पार पाडावी.
यासोबतच वाहतूक पोलिसांनी या परिसरात विशेष मोहीम राबवून भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
“अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा, अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे,” अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.






