अकलूज आगारात थोड्याशा पावसातच तळे; पालखी सोहळ्यापूर्वी तातडीने मुरूम टाकण्याची प्रवाशांची मागणी
अकलूज | प्रतिनिधी
पावसाळ्याला सुरुवात होताच अकलूज एसटी आगाराची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. थोडासा पाऊस झाला तरी आगार परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, संपूर्ण परिसराचे अक्षरशः तळ्यात रूपांतर होत आहे.
यामुळे एसटी प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना चिखल आणि पाण्यातून मार्ग काढत बसस्थानकात ये-जा करावी लागत आहे.
आगाराच्या मुख्य प्रवेशद्वारासह बस उभ्या राहण्याच्या परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
अनेकदा वाहनचालकांनाही वाहन चालविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, बसमधून उतरताना प्रवाशांना थेट पाण्यात पाय ठेवावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर 20 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांसह इतर चार पालख्यांचे अकलूजमध्ये आगमन व मुक्काम होणार आहे. या सोहळ्यासाठी हजारो वारकरी, भाविक आणि प्रवासी अकलूजमध्ये दाखल होणार असल्याने आगार परिसरातील ही अवस्था प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना याच चिखल आणि साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागल्यास प्रशासनावर टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.
स्थानिक प्रवासी आणि नागरिकांनी अकलूज आगार प्रमुखांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
आगार परिसरातील खड्डे त्वरित मुरूम टाकून भरावेत, पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी आणि पालखी आगमनापूर्वी परिसर स्वच्छ व सुरक्षित करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रवाशांचे म्हणणे आहे की, दरवर्षी पावसाळ्यात हीच समस्या निर्माण होते. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरती मलमपट्टी केली जाते.
त्यामुळे प्रशासनाने यावेळी तरी गंभीर दखल घेऊन आगाराची दुरुस्ती करावी आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






