अकलूज येथे १९ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन
अकलूज : दुर्गराज श्री रायगड ते भूवैकुंठ पंढरपूर या पवित्र प्रवासातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे अकलूज येथे रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता आगमन होणार आहे.
या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अकलूज व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता सराटी येथील पुलाजवळ शिवछत्रपतींच्या पुरुषार्थी निरा स्नानाने होईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होईल. सकाळी ९.३० वाजता अकलूज येथील गांधी चौकात पालखीचे जंगी स्वागत करण्यात येणार असून सकाळी १० वाजता विजय चौक येथे बालगोपाल रिंगणाचा कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर दुपारची विश्रांती अकलूज येथील महादेव मंदिरात होईल.या ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी अकलूजसह परिसरातील शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






