अकलूजमध्ये श्री अकलाई देवी यात्रेची लगबग; ३१ जुलै रोजी भंडारा, १ ऑगस्टला पारंपरिक छबिना
अकलूज (प्रतिनिधी) : अकलूजचे ग्रामदैवत असलेल्या श्री अकलाई देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
अकलूजसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अकलाई देवी देवस्थानात शुक्रवार, ३१ जुलै २०२६ रोजी पारंपरिक यात्रा (भंडारा) मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरी करण्यात येणार आहे.
यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.देवस्थान समितीच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी सुरू असून, मंदिर परिसर आकर्षक सजावटीने नटविण्यात येणार आहे.

देवीच्या दर्शनासाठी तसेच यात्रेच्या धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अकलूजसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे
.यात्रेनंतर शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता श्री अकलाई देवीचा पारंपरिक छबिना सोहळा मोठ्या भक्तिभावाने काढण्यात येणार आहे.
या सोहळ्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात, जयघोष आणि भक्तिरसपूर्ण वातावरणात देवीची मिरवणूक काढली जाणार असून, हा सोहळा यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे
.श्री अकलाई देवी देवस्थानाचे कार्यकारी विश्वस्त मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी सर्व भाविकांनी यात्रा व छबिना सोहळ्यास उपस्थित राहून श्री अकलाई देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करावेत, असे आवाहन केले आहे.
अकलूजच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेली ही यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाही भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात यात्रा संपन्न होणार असल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.






