माळशिरस तालुक्यातील सर्जन डॉक्टरांविरोधात गंभीर आरोप; अनेक शस्त्रक्रियांबाबत नातेवाईकांनी उपस्थित केले प्रश्न
माळशिरस, प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यात विविध खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करणाऱ्या एका सर्जन डॉक्टरांविरोधात काही रुग्णांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत.
संबंधित शस्त्रक्रियांमध्ये हलगर्जीपणा झाल्याचा दावा करत या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, एका महिलेच्या गर्भाशयाजवळील गाठीवर शस्त्रक्रिया सुरू असताना उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या मृत्यूस डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून,
या घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, दुसऱ्या एका महिलेवर सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी तिच्या पोटात गाठ आढळल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.
या संदर्भात संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
तसेच अशा प्रकारच्या आणखी काही घटना घडल्याचा दावा काही नागरिक व रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत असून, या सर्व प्रकरणांची वैद्यकीय तज्ज्ञ समितीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित डॉक्टर किंवा संबंधित रुग्णालयाची अधिकृत भूमिका अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यांची बाजू समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
या सर्व प्रकरणांतील आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित यंत्रणांकडून चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.







