माळशिरस तालुक्यात पाणीटंचाई; वॉटर प्लॅन्टकडून जारच्या दरात वाढ, नागरिकांत संताप
माळशिरस : सध्या पावसाळा सुरू असला तरी माळशिरस तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे तालुक्यात अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते व संघटनांकडून नागरिकांच्या सोयीसाठी पाण्याचे टँकर सुरू करून पाणीपुरवठा केला जात आहे.
मात्र, दुसरीकडे माळशिरस तालुक्यातील काही वॉटर प्लॅन्ट चालकांनी पिण्याच्या पाण्याच्या जारच्या दरात वाढ केली आहे.
पूर्वी २० रुपयांना मिळणारा पाण्याचा जार आता ३० रुपयांना विकला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आधीच पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना पाण्याच्या जारच्या दरात करण्यात आलेली वाढ ही सर्वसामान्यांच्या खिशाला अतिरिक्त भार ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे
. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन वाढीव दराची चौकशी करावी आणि नागरिकांना वाजवी दरात पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.







