बावडा टोल नाक्यावरील गैरसोयी दूर करण्याची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा
इंदापूर, (प्रतिनिधी )राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील इंदापूर–अकलूज मार्गावरील बावडा टोल नाक्यावर नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात पावसाळ्यात टोल नाक्यावरील मोटारसायकल लेनमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच टोल नाक्यावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने ती सुरू करावी, स्पीड ब्रेकर व रिफ्लेक्टर दुरुस्त करावेत, स्वच्छतागृहांची स्वच्छता नियमित ठेवावी आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय पालखी मार्गावरील डिव्हायडरमध्ये उगवलेली काटेरी झुडपे काढावीत, महामार्गावर अनेक ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा निचरा करावा, अपूर्ण राहिलेली गटारे पूर्ण करावीत तसेच रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
वकिलवस्ती परिसरात वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन त्या ठिकाणी योग्य ती कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
तसेच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन करावे, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे विठ्ठलराव घोगरे पाटील यांनी दिला आहे.







