चार दशकांची निर्भीड लेखणी : ज्येष्ठ पत्रकार भारत (तात्या) यांच्या पत्रकारितेच्या ४० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम!
परवा माळशिरस तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार भारत तात्या यांच्यासोबत निवांत गप्पा मारण्याचा योग आला. दुपारची वेळ होती. भर उन्हात तात्या आलेले पाहून मी सहजच विचारले, “तात्या, एवढ्या उन्हात कशासाठी आलात?” त्यावर त्यांनी हसत उत्तर दिले, “दुपारी तीन वाजता एका कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आहे, म्हणून वेळेआधी आलो. “चहा घेत गप्पांचा फड रंगला आणि विषय निघाला.त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाचा.
त्यानंतर जवळपास चार दशकांच्या पत्रकारितेतील असंख्य आठवणी, संघर्ष, यश, अनुभव आणि समाजहितासाठी केलेल्या कामांची जणू एक जिवंत कहाणीच माझ्यासमोर उलगडत गेली.
त्यावेळी जाणवले की, पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून ती एक समाजसेवा आहे आणि त्या सेवेचे व्रत आयुष्यभर जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे भारत तात्या
.आज, ४ जुलै रोजी, त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला तब्बल ४० वर्षे पूर्ण होत आहेत. ४ जुलै १९८६ रोजी सोलापूर येथील केसरी गर्जने या वर्तमानपत्रातून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली . त्या काळात ना आजच्या सारखी आधुनिक तंत्रज्ञानाची साधने होती, ना सोशल मीडियाचा आधार. केवळ जिद्द, प्रामाणिकपणा, बातमी शोधण्याची वृत्ती आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी या भांडवलावर त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल टाकले.
त्यानंतर संचार, तरुण भारत, लोकमत, पुढारी, पुणे वर्तमान, प्रभात, सामना अशा अनेक नामांकित दैनिकांमध्ये त्यांनी आपल्या लेखणीचा ठसा उमटवला.
मात्र त्यांच्या पत्रकारितेचा सुवर्णकाळ म्हणावा असा कालखंड म्हणजे १९९८ ते २०१४ या दरम्यानचा लोकसत्ता आणि इंडियन एक्स्प्रेसमधील प्रवास.
या काळात त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक विषय, प्रशासनातील त्रुटी, लोकहिताचे मुद्दे आणि जनतेच्या भावनांना प्रभावीपणे वाचा फोडली
.निमगावसारख्या एका छोट्याशा खेड्यातून पत्रकारितेला सुरुवात केलेल्या या पत्रकाराने आपल्या अभ्यासपूर्ण, तथ्याधारित आणि प्रभावी लेखनाच्या जोरावर राज्यातील नामांकित वर्तमानपत्रांमध्ये विशेष स्थान मिळवले.
त्यांच्या अनेक बातम्यांना लोकसत्ताच्या मुख्य पानावर स्थान मिळाले. ही बाब केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर ग्रामीण भागातील पत्रकारांसाठीही प्रेरणादायी ठरली.
तात्या सांगत असलेला एक प्रसंग विशेष लक्षात राहणारा आहे. अपघाताच्या गुन्ह्यांमध्ये सहज जामीन मिळत असल्याने अशा घटनांचे गांभीर्य कमी होत असल्याबाबत त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले. या बातम्यांची दखल घेत तत्कालीन गृहमंत्र्यांनी संबंधित कायद्यात दुरुस्ती करून तो गुन्हा अजामीनपात्र करण्याचा निर्णय घेतल्याचे ते अभिमानाने सांगतात.
एखाद्या पत्रकाराच्या लेखणीने समाजव्यवस्थेत आणि शासनाच्या धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, यापेक्षा मोठे यश कोणते असू शकते?
पत्रकारितेच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी केवळ दैनिकांपुरतेच स्वतःला मर्यादित ठेवले नाही. चित्रलेखा, पोलीस टाइम्स, सह्याद्री यांसारख्या साप्ताहिकांमधूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले.
आजही त्यांची लेखणी तितक्याच ताकदीने चालू असून ते सध्या दिव्य मराठी परिवारात कार्यरत आहेत.
भारत तात्या यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा माणुसकीचा स्वभाव. पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेकदा स्पर्धा, मतभेद आणि संघर्ष पाहायला मिळतात
; परंतु तात्या यांच्याकडे पाहिले की पत्रकारितेतील सहकार्य, आपुलकी आणि मार्गदर्शनाची परंपरा दिसून येते. आम्हा नवोदित पत्रकारांसाठी ते एक चालते-बोलते विद्यापीठच आहेत.
कोणतीही अडचण असो, कोणताही प्रश्न असो, ते नेहमी मदतीसाठी पुढे असतात. योग्य सल्ला देणे, चुका समजावून सांगणे आणि नव्या पिढीला घडवणे हे त्यांनी आपले कर्तव्यच मानले आहे.
त्यांच्या पत्रकारितेतील सर्वात मोठा गुण म्हणजे निष्पक्षता. कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल पूर्वग्रह नाही, कोणत्याही व्यक्तीबद्दल आकस नाही आणि कोणत्याही विषयाकडे एकांगी दृष्टीकोन नाही. प्रत्येक बातमीची दोन्ही बाजू समजून घेऊन सत्य जनतेसमोर मांडण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला.
म्हणूनच सर्वच पक्षांचे नेते, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली आहे.
आजच्या वेगवान आणि अनेकदा दिशाहीन होत चाललेल्या पत्रकारितेच्या काळात भारत तात्या यांच्यासारखे पत्रकार हे मूल्याधिष्ठित पत्रकारितेचे जिवंत उदाहरण आहेत.
चार दशकांच्या या प्रवासात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले, बदलते तंत्रज्ञान अनुभवले, पत्रकारितेचे बदलते स्वरूप पाहिले; पण सत्य, प्रामाणिकपणा आणि समाजहित या मूल्यांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही
.त्यांच्या ४० वर्षांच्या पत्रकारितेच्या या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर आम्हा सर्व नवोदित पत्रकारांना त्यांचा अभिमान वाटतो.
त्यांचा प्रवास आम्हाला प्रेरणा देणारा आहे, त्यांचे कार्य आम्हाला दिशा देणारे आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व आम्हाला आदर्श वाटणारे आहे.
ज्येष्ठ पत्रकार भारत (तात्या) यांना पत्रकारितेच्या ४० वर्षांच्या यशस्वी, प्रेरणादायी आणि गौरवशाली प्रवासाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या लेखणीला अशीच धार लाभो, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🌹💐 हार्दिक शुभेच्छा तात्या! 💐🌹 गणेश लक्ष्मण जाधव पत्रकार अकलूज







