अकलूजमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पादुकांचे ४ जुलै रोजी आगमन; दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अकलूज, (प्रतिनिधी ): श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी अत्यंत आनंदाची व भक्तिमय पर्वणी ठरणारा सोहळा अकलूज नगरीत पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.
सालाबादप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पादुकांचे शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी अकलूज येथे आगमन होत असून, या निमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा अकलूज सेवेकरी यांच्या वतीने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात शनिवार, दि. ४ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता अकलूज येथील विठ्ठल मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पादुकांच्या आगमनाने होणार आहे. पादुकांच्या स्वागतानंतर दिवसभर भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे . सायंकाळी ७ वाजता आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, हा कार्यक्रम सौ. शर्मिलादेवी किशोरसिंह माने पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
यानंतर पादुकांचा मुक्काम अकलूज येथे राहणार आहे.रविवार, दि. ५ जुलै रोजी पहाटे ६ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पादुकांचा अभिषेक, पूजा व महाआरतीचा धार्मिक विधी पार पडणार आहे.
हा विधी सौ. युगंधरा क्रांतीसिंह माने पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार असून, यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेणार आहेत. त्यानंतर सकाळी ८ वाजता भक्तिमय वातावरणात पालखीचे प्रस्थान होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परिसरातील तसेच तालुक्यातील अनेक गावांमधून भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन, अभिषेक, आरती आणि पालखी सोहळा यामुळे अकलूजमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
या पवित्र धार्मिक सोहळ्यास सर्व स्वामीभक्तांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पादुकांचे दर्शन घ्यावे व आध्यात्मिक लाभ मिळवावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा अकलूज सेवेकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.







