हायकोर्टात विजय मिळाल्यानंतर विरोधकांचा संताप; आंब्याची बाग उद्ध्वस्त, लाखोंचे नुकसान, जीवे मारण्याच्या धमक्यांचा आरोप
माळशिरस, प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील विजयवाडी येथील वडिलोपार्जित जमिनीच्या दीर्घकालीन वादाला न्यायालयीन स्तरावर यश मिळाल्यानंतर विरोधकांनी सूडबुद्धीने आंब्याच्या बागेची तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा गंभीर आरोप शेतकरी किरण प्रमोद गिरमे यांनी केला आहे.
या प्रकरणात आंब्याची चोरी, केळीच्या पिकाची नासधूस, शेकडो आंब्याची झाडे तोडून जाळणे तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
किरण प्रमोद गिरमे (वय 49, रा. विजयवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मौजे विजयवाडी येथील गट क्रमांक 45/2/अ मधील 99 आर क्षेत्र ही त्यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन आहे.
या जमिनीच्या काही भागासंदर्भात सन 2005 मध्ये झालेल्या व्यवहाराबाबत पुढे सावकारी स्वरूपाचा वाद निर्माण झाला होता. संबंधित व्यवहाराबाबत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता.
त्यानंतर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांनी 12 मार्च 2024 रोजी संबंधित खरेदीखत रद्द करून जमिनीवरील कायदेशीर हक्क अर्जदारांच्या बाजूने असल्याचा निर्णय दिला होता.
दरम्यान, याच जमिनीसंदर्भातील दिवाणी वाद न्यायालयातही सुरू होता. कनिष्ठ स्तरावरील न्यायालयातील निर्णयानंतर दाखल करण्यात आलेल्या अपीलमध्ये अर्जदारांच्या बाजूने स्थगिती आदेश देण्यात आला.

त्याविरोधात दाखल करण्यात आलेली रिट याचिकाही 22 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाने निकाली काढल्याने गिरमे कुटुंबाला न्यायालयीन दिलासा मिळाला.फिर्यादीनुसार, न्यायालयीन निर्णयानंतर शेजारी राहणाऱ्या प्रल्हाद लावंड, प्रणाली लावंड व हेमलता लावंड यांच्यासह इतरांनी गिरमे कुटुंबाला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
“जमिनीत आलात तर जिवंत ठेवणार नाही, तसेच तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकवू,” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे
.गिरमे यांनी गट क्रमांक 45/2/अ मधील सुमारे 50 आर क्षेत्रात 1300 आंबा व जांभूळ फळझाडांची लागवड केली होती. सन 2024-25 पासून या बागेतील फळांचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले होते.20 मे 2026 रोजी किरण गिरमे हे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे येथे न्यायालयीन कामानिमित्त गेले असताना त्यांच्या पत्नी संजीवनी गिरमे व भाऊ किशोर यांनी दूरध्वनीवरून बागेत काही जण आंब्यांची तोडणी करत असल्याची माहिती दिली
. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता प्रणाली लावंड, हेमलता लावंड, मुकेश नावाचा व्यापारी व काही मजूर आंब्यांची तोडणी करत असल्याचे दिसून आले.यावेळी गिरमे यांच्या पत्नी व भावाने विरोध केला असता त्यांना विनयभंग व छेडछाडीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
त्यानंतर सुमारे एक लाख रुपयांचे आंबे बेकायदेशीरपणे तोडून नेण्यात आले. तसेच सुमारे 15 गुंठे क्षेत्रातील केळीच्या पिकावर रोटर फिरवून अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.
यापुढे 5 जून 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास प्रल्हाद लावंड, प्रणाली लावंड व हेमलता लावंड यांनी बागेतील सुमारे 400 पाच वर्षे वयाची आंब्याची झाडे तोडून ती जाळल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.
या घटनेत अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या संपूर्ण प्रकारामुळे गिरमे कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित आरोपींवर चोरी, मालमत्तेचे नुकसान, धमकी व इतर संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
टीप : वरील वृत्त हे फिर्यादी किरण प्रमोद गिरमे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीतील आरोपांवर आधारित असून, संबंधित आरोपींची बाजू अद्याप समोर आलेली नाही. प्रकरणाचा तपास सुरू असून तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.







