अकलूज नगरपरिषदेकडून पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना आवाहन
अकलूज, दि. १५ जून २०२५ : अकलूज नगरपरिषदेने शहरातील नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचे जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे. पाटबंधारे विभागाकडून सातवण तलावात उशिरा पाणी उपलब्ध होणार असल्याने सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजनपूर्वक वितरण करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे.
निवेदनानुसार, बुधवार १७ जून २०२५ पासून शहराच्या पहिल्या भागात चार दिवसाआड एकदा सकाळी नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा केला जाईल. तसेच गुरुवार १८ जून २०२५ पासून दुसऱ्या भागातही चार दिवसाआड सकाळी नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.याशिवाय, सर्व पाणी कनेक्शनधारकांनी आपल्या नळांना तोटी बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तोटी नसलेल्या नळधारकांचे कनेक्शन त्वरित बंद करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपरिषदेकडून देण्यात आला आहे.
तसेच नळाच्या पाण्याने वाहने धुणे, अंगण किंवा रस्त्यावर पाणी मारणे, तसेच पाणी नाल्यात सोडून अपव्यय करणे आढळल्यास संबंधितांचे नळ कनेक्शन खंडित करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
हे निवेदन अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गट-अ (निवडश्रेणी) सचिन पाटील यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.







