हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान 2025-26 मध्ये अकलूज आगाराचा द्वितीय क्रमांक
अकलूज (प्रतिनिधी )हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान 2025-26 अंतर्गत पुणे प्रदेशातील ‘ब’ वर्ग बस स्थानकांमध्ये अकलूज आगाराने द्वितीय क्रमांक पटकावला आहे

. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील एकूण 30 बस स्थानकांचा या वर्गात समावेश होता.
विशेष म्हणजे, गतवर्षी याच अभियानात अकलूज आगाराने प्रथम क्रमांक मिळवला होता.अभियानाच्या सर्वेक्षणाचा अंतिम टप्पा मार्च-एप्रिल 2026 दरम्यान पार पडला. चारही टप्प्यांतील सरासरी गुणांच्या आधारे अंतिम निकाल 29 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आला.

त्यामध्ये अकलूज आगाराला एकूण 94 गुण प्राप्त झाले, तर प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या दहिवडी आगाराला 95 गुण मिळाले.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 जून 2026 रोजी पुणे विभागीय कार्यालयात बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मा. प्रादेशिक व्यवस्थापक सौ. ताम्हणकर मॅडम तसेच प्रादेशिक यंत्र अभियंता (चालन) श्री. कांबळे साहेब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन अकलूज आगाराचा गौरव करण्यात आला.
सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आगार व्यवस्थापक श्री. प्रमोद शिंदे तसेच अभियान कालावधीतील स्वच्छता ठेकेदार श्री. उत्तम भोसले उपस्थित होते. यानंतर आगारात ट्रॉफीचे आगमन होताच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून तिचे स्वागत केले.
या यशामुळे आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या अभियानाच्या यशामध्ये अकलूज आगारातील कर्मचारी, अकलूज शहरातील व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती तसेच पत्रकार बंधू यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या बहुमूल्य सहकार्यामुळे अकलूज बस स्थानकाच्या स्वच्छता, सुशोभीकरण आणि सजावटीच्या उपक्रमांना मोठी चालना मिळाली. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अकलूज आगाराला हा मानाचा बहुमान प्राप्त झाला.
अकलूज आगाराच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎉🚌🏆






