*अकलूज येथे प्रेरणादायी जाहीर व्याख्यानाचे आयोजन* *डीजेला फाटा… विचारांना वाट!” उपक्रमातून समाजप्रबोधनाचा संदेश*
अकलूज :(प्रतिनिधी )पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जय मल्हार प्रतिष्ठान, अकलूज यांच्या वतीने प्रेरणादायी जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

“डीजेला फाटा… विचारांना वाट!” या संकल्पनेवर आधारित हा विशेष कार्यक्रम रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता विजय चौक, अकलूज येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्ते डॉ. वसंत हंकारे सर हे “न समजलेले आईबाप…” या अत्यंत भावनिक आणि समाजप्रबोधनात्मक विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

आधुनिक काळात कुटुंब व्यवस्था, आई-वडिलांचे त्याग, संस्कार, नाती आणि कर्तव्य यांविषयी तरुण पिढीत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न या व्याख्यानातून करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे डीजे आणि ध्वनीप्रदूषणाला दूर ठेवून विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्याचा संदेश आयोजकांनी दिला आहे.
समाजात सकारात्मक विचारांची ताकद वाढविणे, संस्कारांची जपणूक करणे आणि पालकांविषयी आदर निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमात “मल्हारश्री पुरस्कार” तसेच “अहिल्यारत्न पुरस्कार” देऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे.
त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर पोटे हे असणार असून उपाध्यक्ष म्हणून अमोल राजगे कार्यभार सांभाळणार आहेत.

जय मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








