संस्थेचे संचालकच बनले जनतेचे प्रतिनिधी ; अकलूजमध्ये विजयी मान्यवरांचा दिमाखदार सत्कार”
अकलूज :(प्रतिनिधी )नेतृत्व, विश्वास आणि जनसेवेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला तो रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सहकारी संस्थेच्या सन्मान सोहळ्यात. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश संपादन करून जनतेचा विश्वास जिंकलेल्या संस्थेच्या संचालकांचा भव्य सत्कार उत्साहात पार पडला.
या सोहळ्याची खास बाब म्हणजे, सन्मानित सर्व मान्यवर हे संस्थेचेच संचालक असून त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपली छाप उमटवत विजय मिळवला आहे.
जिल्हा परिषद गट बोरगाव येथून विजयी झालेले नागेश भोसले, अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले विलास क्षीरसागर आणि पंचायत समिती गण माळीनगर येथून निवडून आलेले महादेव साबळे हे या सोहळ्याचे मानकरी ठरले.
चेअरमन श्रीकांत देशमुख, उपाध्यक्ष सुजित तरंगे आणि संचालक इंद्रराज दोशी यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
टाळ्यांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपाध्यक्ष सुजित तरंगे यांचा वाढदिवसही आनंदात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला संचालक, सभासद, कर्मचारी आणि शेतकरी बांधवांची मोठी उपस्थिती लाभली.
मार्गदर्शक म्हणून विजयसिंह मोहिते पाटील, राजसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि शितलदेवी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्था सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
हा सोहळा म्हणजे संस्थेच्या यशाचा आणि जनतेच्या विश्वासाचा उत्सवच ठरला!






