लोटस स्कूल, मोहोळ येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा
*लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी*२७ फेब्रुवारी हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे.
मराठी साहित्यातील त्यांचे अतुलनीय योगदान आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी २०१३ पासून हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस केवळ शुभेच्छा देण्यासाठी नाही तर, आपली मायबोली मराठीचा सन्मान करण्यासाठी, तिचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केला जातो.
दिनांक: २७/०२/२०२६ वार: शुक्रवार रोजी लोटस स्कूल, मोहोळ येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. सुलोचना पाटील मॅडम या उपस्थित होत्या तसेच शाळेच्या संस्थापिका सौ. विजया देशपांडे मॅडम व सौ. रोहिणी देशपांडे मॅडम यादेखील उपस्थित होत्या. सर्व उपस्थित मान्यवरांनी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विषयाच्या शिक्षिका सौ अंजली देशपांडे मॅडम यांनी केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पथनाट्य सादर केले. तसेच LKG मधील काव्यांजली देशमुख या छोट्याशा विद्यार्थीनीने छान असे बडबडगीत सादर केले.
पथनाट्यासाठी सौ. अंजली देशपांडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे फलक लेखन सौ. स्मिता गुमते मॅडम व सौ. सोनाली स्वामी मॅडम यांनी केले. सौ. राणी पुराणिक मॅडम व सौ. प्रणिता गरड मॅडम यांनी सुंदर रांगोळी काढली.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.केतकी देशपांडे आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निकिता देशपांडे आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






