*अकलूज-वेळापूर मार्गावरील खड्ड्यांचा ‘लालपरी’ला मोठा फटका!**बसचे सुटे भाग निकामी; प्रवाशांचे आरोग्य धोक्यात अन् महामंडळाचे आर्थिक कंबरडे मोडले**क्रमशः भाग -7.*
अकलूज (प्रतिनिधी):अकलूज ते वेळापूर या मुख्य रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, सामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी ‘एसटी बस’ आता खड्ड्यांच्या विळख्यात अडकली आहे
. या मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे एसटी बसचे प्रचंड तांत्रिक नुकसान होत असून, यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर मोठा भार पडत आहे.
*कमानी पट्टे तुटण्याचे प्रमाण वाढले*
खड्ड्यांच्या तीव्र धक्क्यांमुळे बसचे कमानी पट्टे (Leaf Springs) वारंवार तुटण्याच्या घटना घडत आहेत. वजनदार बस जेव्हा वेगाने खड्ड्यात आदळते, तेव्हा सस्पेन्शन यंत्रणेवर ताण येऊन बस जागीच निकामी होत आहे. यामुळे भर रस्त्यात बस उभी राहत असल्याने प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. तसेच, टायर फाटणे आणि स्टिअरिंग मधील बिघाड, पाटा तुटणे यामुळे बसच्या देखभालीचा खर्च दुपटीने वाढला आहे.
*प्रवाशांच्या मणक्याचे आजार बळावले*
केवळ बसचेच नाही, तर प्रवाशांच्या आरोग्याचेही या खड्ड्यांमुळे नुकसान होत आहे. खड्ड्यात आदळणाऱ्या बसमुळे प्रवाशांना तीव्र धक्के बसत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांना कंबरदुखी व मणक्याचे त्रास जाणवू लागले आहेत. विद्यार्थ्यांना देखील त्रास होत आहे.अनेकवेळा गरोदर महिला देखील बस ने प्रवास करीत असतात. त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.बसमधील धक्क्यांमुळे अनेकदा प्रवासी सीटवरून उसळून पडल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.
*डिझेलची मोठी नासाडी*
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकाला वारंवार गिअर बदलावा लागतो आणि गाडीचा वेग कमी-जास्त करावा लागतो. याचा थेट परिणाम बसच्या ‘अॅव्हरेज’वर (Mileage) होत असून, डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
“रस्ता खराब असल्याने बस वेळेवर पोहोचत नाही आणि गाडी चालवताना प्रचंड शारीरिक थकवा जाणवतो,” अशी व्यथा एका एसटी चालकाने व्यक्त केली.
*ठळक मुद्दे:*
वेळेचा खेळखंडोबा: १५ मिनिटांच्या अंतरासाठी बसला आता ४५ मिनिटे लागत आहेत.फेऱ्या रद्द: बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक स्थानिक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत.प्रशासनाचे दुर्लक्ष: वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत असल्याचा आरोप.
*आगार व्यवस्थापनाची डोकेदुखी:*
अकलूज आणि आसपासच्या हैद्राबाद, सोलापूर,पंढरपूर, सांगोला बारामती, जत, मंगळवेढा आगारातील बस गाड्यांची स्थिती या रस्त्यामुळे खालावली आहे. वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
एकंदरीत, अकलूज–वेळापूर मार्गाची दुरवस्था केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून तो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा, आरोग्याचा आणि एसटी महामंडळाच्या अस्तित्वाचा गंभीर विषय बनला आहे. तातडीने रस्त्याची दुरुस्ती व मजबूत पुनर्बांधणी न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
*क्रमशः भाग -7.*
🚨 अकलूज – वेळापूर रस्ता : संघर्ष सुरूच 🚨 अकलूज – वेळापूर रस्त्यावरील गंभीर समस्यांविरोधात १५ फेब्रुवारीपासून संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करत आहे. 👥 नागरिकांची व्यथा स्पष्ट आहे —“दररोजचा प्रवास म्हणजे जीवघेणा संघर्ष!”खड्डे, अपूर्ण काम, धूळ, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. 🙏 अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले —“कुणीतरी आमचा आवाज उठवतोय!” 🔥 आम्ही थांबणार नाही!रस्ता पूर्ण आणि सुरक्षित होईपर्यंत सातत्याने बातम्या प्रसिद्ध करत राहू. ➡️ तुमचे अनुभव, तक्रारी व सूचना आम्हाला पाठवा 📲 ७८४१८४७४५८
एकत्र येऊया, आवाज बुलंद करूया! 💪






