📰 माळशिरस येथील ब्रिटीशकालीन पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी — पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस शहरातील ब्रिटीशकालीन पोलीस वसाहतीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
ते आज माळशिरस पोलीस ठाणे येथे भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.
या वेळी अकलूज विभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील जानकर, संदीप गोसावी आणि स्वाती पवार उपस्थित होते.
माळशिरस शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या जागेत पोलीस ठाणे व पोलिसांसाठीची ब्रिटीशकालीन वसाहत आहे. अनेक वर्षांपासून या इमारतींची दुरवस्था झाली असून, नव्या पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यात आली असली तरी पोलिसांच्या निवासाचा प्रश्न मात्र प्रलंबित होता. वसाहत नसल्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी सध्या शहराबाहेर राहण्यास मजबूर आहेत
.या ठिकाणी नातेपुते व माळशिरस पोलिसांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त वसाहत उभारली जाणार असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा निवासाचा प्रश्न लवकरच सुटणार आहे, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.वसाहतीची पाहणी केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी विभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांना संबंधित विभागाशी संपर्क साधून जुनी वसाहत पाडण्याच्या सूचना दिल्या.
तसेच परिसर सुरक्षित करण्यासाठी कडेला झाडांची लागवड करण्याचेही आदेश दिले.यावेळी अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर जिल्हा ‘डीजे-मुक्त’ घोषित केल्याचे सांगून, आगामी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजेचा वापर टाळावा, असे आवाहन नागरिकांना केले
.उल्लेखनीय बाब म्हणजे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून माळशिरस पोलीस ठाण्यात काम केले होते.
त्या काळात त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल करून कायदा व सुव्यवस्था उत्तम राखली होती. त्यांनी त्या वेळी केलेली वृक्षलागवड आज मोठ्या झाडांच्या रूपात पाहताना ते भारावून गेले आणि त्या झाडांखाली छायाचित्रेही काढली
. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.






