🚧 रस्त्यावरील त्रुटींचा प्रवाशांवर फटका : अकलूज–वेळापूर मार्ग धोक्यातक्रमशः भाग – 4.
अकलूज (प्रतिनिधी):अकलूज ते वेळापूर या वर्दळीच्या मुख्य मार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागठाणा, खंडाळी आणि माळेवाडी चौक हे भाग अत्यंत धोकादायक बनले आहेत.
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संताप व्यक्त होत आहे.नागठाणा परिसरात रस्त्याची दुरवस्था, मोठे खड्डे व तीव्र वळणांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहेत.
खंडाळी भागात रस्त्याच्या कडेला उभी राहणारी वाहने वाहतुकीस अडथळा ठरत असून रस्ता अरुंद बनत आहे.माळेवाडी चौकात चारही दिशांनी वाहतूक येत असल्याने येथे कायम गोंधळाची स्थिती असते.
शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक, सिग्नल यंत्रणा व वाहतूक नियमन नसल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे.अकलूज–वेळापूर मुख्य चौकात अवजड वाहनांना वळणे घेताना मोठी अडचण येते. दिशादर्शक फलक आणि सिग्नल यंत्रणा नसल्याने बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
वेळापूर–खंडाळी–अकलूज या संपूर्ण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हे अपघातांचे मुख्य कारण बनले आहेत. रात्री अपुरा प्रकाश तसेच ट्रॅक्टर व अवजड वाहनांवर रिफ्लेक्टर नसल्यामुळे हा मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे.
🔴 नागरिकांच्या ठोस मागण्या
स्थानिक नागरिकांनी माळेवाडी व वेळापूर चौकात हायमास्ट दिवे, कायमस्वरूपी वाहतूक पोलीस बंदोबस्त, तसेच नागठाणा व खंडाळी परिसरातील धोकादायक वळणांवर संरक्षक कठडे आणि सूचना फलक बसवण्याची मागणी केली आहे.
आरटीओने ट्रॅक्टर व अवजड वाहनांवर कडक कारवाई करून रिफ्लेक्टर सक्तीने लावावेत, अशीही जोरदार मागणी करण्यात आली आहे.प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या मार्गाच्या सुरक्षिततेबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक बनले आहे.
प्रशासकीय अनास्था की मृत्यूची प्रतीक्षा?
अकलूज-वेळापूर रस्त्यावरील नागठाणा, खंडाळी आणि माळेवाडी चौक हे भाग आता केवळ अपघाताची ठिकाणे उरली नसून, ते प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारे ‘डेथ झोन’ बनले आहेत.
दररोज होणारे छोटे-मोठे अपघात आणि त्यात जाणारे निष्पाप बळी पाहूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन अजूनही गाढ झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे.
केवळ कागदोपत्री पंचनामे आणि तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा, या मार्गावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवणे, माळेवाडी सारख्या गजबजलेल्या चौकात सिग्नल यंत्रणा बसवणे आणि रात्रीच्या वेळी ऊस वाहतुकीवर कडक निर्बंध लादणे, हे आता केवळ मागण्या उरल्या नसून तो नागरिकांचा अधिकार बनला आहे.
जर येत्या काही दिवसांत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष दिले नाही, तर या परिसरातील संतप्त नागरिक ‘चक्का जाम’ किंवा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.
आता प्रश्न उरतो तो इतकाच की, प्रशासन अजून किती बळींची प्रतीक्षा करणार?”वेळ निघून जाण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होऊन या ‘मृत्यूच्या महामार्गाला’ सुरक्षित रस्ता बनवण्याची तसदी घ्यावी, हीच सर्वसामान्य जनतेची माफक अपेक्षा आहे.
“क्रमशः भाग – 4.
🚨 अकलूज – वेळापूर रस्ता : संघर्ष सुरूच 🚨१५ फेब्रुवारीपासून संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल या रस्त्यावरील समस्या उघड करणारी वृत्तमालिका सातत्याने प्रसिद्ध करत आहे .👥 नागरिक म्हणतात — “दररोजचा प्रवास म्हणजे जीवघेणा संघर्ष!” 🙏 अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले — “कुणीतरी आमचा आवाज उठवतोय!” 🔥 आम्ही थांबणार नाही!रस्ता पूर्ण होईपर्यंत सातत्याने वृत्त प्रकाशित करत राहू!! ➡️ तुमचे अनुभव, तक्रारी व सूचना पाठवा📲 ७८४१८४७४५८






