अकलूजमधील ५१ शिवभक्त व रणरागिणींनी अनुभवला ‘रणपती शिवराय’चा थरार; ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी
अकलूज (प्रतिनिधी):छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष देणारा आणि त्यांच्या मुत्सद्देगिरीचे दर्शन घडवणारा ‘रणपती शिवराय स्वारी – आग्रा’ हा ऐतिहासिक चित्रपट अकलूज येथे मोठ्या उत्साहात पाहण्यात आला.
अकलूजमधील मित्रमंडळींच्या वतीने आयोजित या खास उपक्रमात ५१ शिवभक्त आणि रणरागिणींनी एकत्रितपणे हा सिनेमा पाहिला.सविस्तर वृत्त असे की, अकलूज येथील श्रीराम चित्रमंदिर येथे दिनांक ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या शोदरम्यान हा उपक्रम राबवण्यात आला.
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथील ऐतिहासिक व अत्यंत कठीण स्वारी, त्यांची सुटका, अतुलनीय शौर्य आणि अजोड बुद्धिमत्ता (मुत्सद्देगिरी) अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.सिनेमा पाहताना उपस्थित शिवभक्तांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले.
तरुण पिढीला आपल्या वैभवशाली इतिहासाची माहिती मिळावी आणि त्यांच्यात स्वराज्याचे विचार रुजावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीमध्ये इतिहासाबद्दलची जागरूकता वाढते आणि त्यांना एक नवी प्रेरणा मिळते, अशी भावना उपस्थित मान्यवर आणि शिवप्रेमींनी व्यक्त केली.यामुळे समाजात राष्ट्रप्रेम आणि शिवरायांप्रती असलेला आदर अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे आयोजकांनी यावेळी सांगितले.
उपक्रमाच्या शेवटी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
*चौकट :-*दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवराज अष्टक’ मालिकेतील सहावे पुष्प ‘रणपति शिवराय: स्वारी आग्रा’ हा ऐतिहासिक चित्रपट अकलूज येथील 51शिवभक्त मित्रां सोबत नुकताच पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर यांच्या जागी आलेल्या अभिजीत श्वेतचंद्र यांची भूमिका हृदस्पर्शी आहे.औरंगजेबाच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी यांनी पुन्हा एकदा आपल्या क्रूर आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत पुनीत इस्सार यांचा भारदस्त अभिनय विशेष भावला.चित्रपट केवळ युद्धावर आधारित नसून महाराजांच्या राजकीय मुत्सद्देगिरीवर आणि बुद्धीचातुर्यावर भाष्य करतो, नेहमीप्रमाणे दिग्पाल लांजेकर यांचे संवाद अंगावर काटा आणणारे आहेत. गाणी मर्यादित असली तरी कथानकाला पुढे नेणारी आणि प्रभावी आहेत. चित्रपटाचे भव्य सेट्स आणि वेशभूषा यांमुळे प्रेक्षक शिवकाळात गेल्याचा अनुभव येत आहे.*शिवाजीराव घोडके**एक शिवभक्त, अकलूज,*






