गिरझणी -संग्रामनगर रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी.नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
अकलूज(प्रतिनिधी) –प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत गिरझणी ते संग्रामनगर हा 4किलोमीटर चा रस्ता काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला आहे.वास्तविक पाहता,रस्ता तयार करताना वळणाच्या ठिकाणी, चौकात गतिरोधक बसविणे आवश्यक होते.
परंतु संबंधित ठेकेदारांनी केवळ काही ठिकाणी पांढऱ्या पट्ट्या ओढल्या आहेत.
या मुख्य रस्त्यावर वाहनांच्या अतिवेगामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. हा मार्ग आता ‘डेथ ट्रॅप’ (मृत्यूचा सापळा) बनत चालला असून, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) अकलूज या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
याच रस्त्यावर अकलूज क्रिटी केअर हॉस्पिटल आहे. त्यामुळे रुग्णांना घेऊन ये जा करणाऱ्या ऍम्ब्युलन्स सुद्धा अनेकवेळा भरधाव वेगाने ये-जा करतात. त्यामुळे इतर वाहन धारकांना ये जा करणे जिकिरीचे ठरत आहे.
बोडके वस्ती ते संग्रामनगर पर्यंत किमान 5ते 6ठिकाणी वळणे आहेत. त्यामुळे वाहन धारकांना वाहन चालवीताना अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकवेळा किरकोळ अपघात देखील झाले आहेत. किमान या ठिकाणी तरी गतिरोधक बसविण्याची आवश्यकता आहे. असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
*शाळकरी मुले व वृद्धांचा जीव धोक्यात*
या रस्त्यावरून दररोज मोठ्या संख्येने शाळकरी मुले, महिला, वयोवृद्ध आणि शेतकरी ये-जा करतात. रस्ता चांगला असल्याने वाहनचालक बेधुंद वेगाने गाड्या चालवतात.
विशेषतः संग्रामनगर वस्ती आणि गिरझणीकडे जाणारे वळण या ठिकाणी वाहनांचा वेग इतका असतो की रस्ता ओलांडताना नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो.
अनेकदा नागरिक थोडक्यात बचावले आहेत, मात्र प्रशासनाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
*ग्रामपंचायतीच्या मागणीला केराची टोपली*
केवळ नागरिकच नव्हे, तर संग्रामनगर ग्रामपंचायतीने देखील या रस्त्याचे गांभीर्य ओळखून लेखी पत्राद्वारे गतिरोधक बसविण्याची अधिकृत मागणी केली आहे. अनेक वेळा स्मरणपत्रे देऊनही अकलूज पीडब्ल्यूडी विभागाने अद्याप साधी पाहणी करण्याचीही तसदी घेतलेली नाही.
त्याप्रमाणे काही नागरिकांनी तोंडी तक्रार दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन देखील दिले आहे.
या सुस्त कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
*नागरिकांमधून संताप*
“आम्ही वारंवार विनंत्या करून थकलो आहोत. साध्या गतिरोधकासाठी प्रशासन लोकांचा जीव जाण्याची वाट पाहत असेल, तर ते दुर्दैवी आहे. आता निवेदन नाही, तर थेट आंदोलनच होईल.”
—,*गणेश लक्ष्मण जाधव.*,सामाजिक कार्यकर्ते संग्रामनगर.
.*आंदोलनाचा इशारा*
जर येत्या काही दिवसांत संग्रामनगर वस्ती आणि वळणाजवळ रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शास्त्रोक्त पद्धतीने गतिरोधक बसविण्यात आले नाहीत, तर अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असेही नागरिकांनी म्हटले आहे.






