गणपती बाप्पा मोरया! अकलूज येथे श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न
अकलूज (प्रतिनिधी) — येथील विजय चौकातील शिवरत्न गणेश उत्सव मंडळ व सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा शुक्रवार, दिनांक ६ रोजी भक्तिमय वातावरणात आणि श्री गणेशाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला.
हा धार्मिक सोहळा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व त्रिकालवंदनीय श्री सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते विधिवत संपन्न झाला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवतेसिंह मोहिते-पाटील तसेच मंडळातील सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या प्रसंगी जयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, धवलसिंह मोहिते-पाटील, फत्तेसिंह माने-पाटील, स्व. प्रभादेवी मोहिते-पाटील, किशोरसिंह माने-पाटील आदी मान्यवरांनी धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला.
दोन दिवस चाललेल्या या सोहळ्याची सुरुवात गुरुवारी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने झाली. त्यानंतर दुपारी दोन ते पाच या वेळेत गणेश स्तवन, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नक्षत्र देवतापूजन, नांदीश्राद्ध, वास्तुशुद्धीकरण, प्राणशुद्धीकरण, कंकणबंधन, जलाभिषेक, जलाधिवास, धान्याधिवास, शैय्याधिवास, मुख्य देवता स्थापन, पीठ पूजन व पीठ स्थापन आदी विधी पार पडले
.शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत पीठ देवता पूजन, गणेश स्तवन, अग्निस्थापन, अग्निपूजन, मुख्य देवता पूजन, अभिषेक, वर्णिदान, अग्निहवन, मूर्ती संस्कार हवन, तसेच मुख्य मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण विधी पूर्ण करण्यात आले.यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत महाआरती व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
याचा लाभ परिसरातील सुमारे ५,००० भाविकांनी घेतला
.या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला असून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते.






