अकलूज येथे श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी):शिवरत्न गणेश उत्सव मंडळ व सेवाभावी संस्था, अकलूज यांच्या वतीने अकलूज येथील विजय चौक, महादेव मंदिर जवळ श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा शुक्रवार, दिनांक ६ रोजी मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.
हा धार्मिक सोहळा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्रिकालवंदनीय श्री सद्गुरु सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. त्यानिमित्त गुरुवार, दिनांक ५ रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत गणेश स्तवन, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नक्षत्र देवता पूजन, नांदीश्राद्ध, वास्तु व प्राण शुद्धीकरण, कंकणबंधन, जलाभिषेक, जलाधिवास, धान्याधिवास, शैय्याधिवास, मुख्य देवता स्थापना, पीठ पूजन व पीठ स्थापना असे विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता महाआरती व प्रसाद वाटप होणार आहे.
शुक्रवार, दिनांक ६ रोजी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत पीठ देवता पूजन, गणेश स्तवन, अग्निस्थापन, अग्निपूजन, मुख्य देवता पूजन, अभिषेक, वर्णिदान, अग्निहवन, मूर्ती संस्कार हवन यासह श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पूर्णाहुतीसह पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पवित्र धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शिवरत्न गणेश उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.






